केजरीवालांनी पाठवला संयोजकपदाचा राजीनामा, बैठकीत चर्चेनंतर अंतिम निर्णय

0
12

नवी दिल्ली – आम आदमी पक्षातील अंतर्गत कलहाच्या नाट्याचा अखेरचा अंक आज सादर होण्याची शक्यता आहे. पक्षाच्या ज्या संयोजक पदावरून संपूर्ण वादाची सुरुवात झाली होती, त्या संयोजकपदाचा राजीनामा अरविंद केजरीवाल यांनी पक्षाकडे पाठवला आहे. त्याबाबत आपच्या आज होणाऱ्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. पण याआधीही एकदा केजरीवाल यांनी संयोजकपदाचा राजीनामा दिला होता. पण पक्षाने एकत्रितपणे निर्णय घेऊन हा राजीनामा फेटाळला होता.

केजरीवाल यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना आपचे प्रवक्ते आशुतोष म्हणाले की, केजरीवाल यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेचच संयोजकपदाचा राजीनामा देणयाची इच्छा व्यक्त केली होती. पण त्यावेळी सर्वांनी त्यांना एकमताने नकार दिला होता. आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने केजरीवाल यांचा राजीनामा फेटाळून पक्षाला त्यांची गरज असल्याचे म्हटले होते. केजरीवाल यांच्या संयोजकपदाला काही जणांनी विरोध केला होता. पण त्या विरोधाबाबतही केजरीवाल यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे आशुतोष म्हणाले आहेत.

दरम्यान, आम आदमी पार्टीच्या आज होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी पक्षविरोधी बातम्या पसरवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या दोघांनीही पक्ष व्यक्ती केंद्रीत होत असून हाय कमांड कल्चरमध्ये वाढ होत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पक्षातील अनेक अंतर्गत बाबी गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या दोघांवरही कडक कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण या दोघांनीही कोणत्याही स्थितीत पक्ष सोडणार नसल्याचे म्हटले आहे.

केजरीवालांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्हं
दिल्लीत आपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर जेव्हा मंत्रिमंडळ तयार होऊन खातेवाटप झाले त्यावेळी अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाशिवाय एकही खाते स्वतःकडे ठेवले नव्हते. पक्षाची जबाबदारी आणि जनतेशी संबंध ठेवता यावा यासाठी त्यांनी खातं घेतलं नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी महत्त्वाची खाती मनीष सिसोदिया यांच्याकडे दिली होती. पण आता त्यांनी संयोजकपदाचाही राजीनामा पाठवला आहे. हा राजीनामा मंजूर झाल्यास केजरीवाल यांच्याकडे सरकारमध्येही महत्त्वाची जबाबदारी नसेल आणि पक्षातही नसेल. त्यामुळे त्यांची भूमिका नेमकी काय असेल? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.