विकासकामांना नव्हे; प्रक्रियेला विरोध;भाजपाच्या तेरा नगरसेवकांचा विरोध

0
13

गोंदिया,दि.30 : गोंदिया नगरपरिषदेची २७ ऑगस्ट रोजी नगर परिषदेच्या सभागृहात विशेष सभा झाली. सदर सभेत गोंदिया शहरात भूमिगत गटार योजनेशी संबंधित चार विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. परंतु सदर विषयांवरील नगरपरिषदेद्वारे आलेल्या टिप्पणीमध्ये खुलासेवर माहिती सांगण्यात आली नाही. एव्हढेच नव्हे तर नगरपषिद सामान्य नागरिकांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा खळखळजनक आरोप सत्ताधारी भाजपाच्या तेरा नागरसेवकांनी केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार सदर भूमिगत गटार योजना २ टप्प्यात होणार असून यात साऊथ झोनमधील काम १३४ कोटी ७ लाख रुपयांचे आहे. या कामाची निविदासुद्धा निघाली असून सर्व कंत्राट प्रक्रिया झाल्यानंतर नगरपरिषद गोंदियाचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी व ही योजना मंजूर करून घेण्यासाठी जी प्रक्रिया राबविण्यात आली ती योग्य नसल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. सदर कार्य नगरपषिद क्षेत्रात होणार असून लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करीत असताना सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच हे काम करीत असताना सर्व नागरिकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. मुख्याधिकारी किंवा नगराध्यक्षांनी या कार्याबद्दल नगरसेवकांना पूर्वकल्पना दिली नाही किंवा या योजनेचा आराखडा दिला गेला नाही. मुख्य गटार कुठून -कुठे होणार, लहान गटार कुठून -कुठे जोडणार, रस्त्यावरील खोदकाम किती खोल होणार इ. बाबींची माहिती देण्यात आली नाही. यामुळे नगरसेवक नागरिकांना गटार योजनेची माहिती कशी देणार? असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला आहे.

नुकतेच शहरात २० कोटी रुपयांची रस्त्यांची कामे सुरू आहेत. जे पूर्ण होण्याचे स्थितीत आहेत. काही कामांची देयकेसुद्धा देण्यात आली आहेत आणि काम प्रगतीपथावर आहेत. आता भूमिगत गटार योजनांची कामे सुरू होतील. पुन्हा हे नवीन रस्ते खोदण्यात येतील मग हा शासनाच्या निधीचा दुरुपयोग नाही का? मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांना भूमिगत गटार योजना मंजूर झाल्याची माहिती असतानासुद्धा संपूर्ण शहरात नवीन रस्ते बांधकामाला मंजुरी देणे, प्रस्ताव तयार करणे, निविदा काढणे, प्रत्यक्षात कामे करणे, झालेल्या कामाची देयके मंजूर करणे, त्याला पेमेंट करणे ही चुकीची बाब आहे. आता परत विविध शासकीय योजनेच्या निधीचे आणि नगरपरिषद निधीचे विविध कामाचे अंदाजपत्रक तयार करणे, तांत्रिक मंजुरी घेणे, प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करणे व निविदा काढणे हे कार्य सुरू आहे. अशा कार्याला मुख्याधिकारी व नगराध्यक्ष थांबवतील का? असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. भूमिगत गटार योजनेला विरोध करणाऱ्या नगरसेवकांमध्ये न.प. उपाध्यक्ष शिव शर्मा, दिलीप गोपलानी, बेबी अग्रवाल, विवेक मिश्रा, भावना कदम, अफसाना पठाण, अनिता मेश्राम, मैथुला बिसेन, आशालता चौधरी, हेमलता पतेह, मौसमी परिहार, निलू बिरीया, वर्षा खरोले यांचा समावेश आहे..