आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयावरील हल्ल्याचा निषेध

0
9

गोरेगाव,दि.30 : पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात घुसून गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी कार्यालयात पत्रके फेकली व तोडफोड केली. ही बाब धनगर आरक्षणाच्या मागणीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घडलेली आहे. आरक्षण मागत असताना आंदोलन शांततेच्या मार्गाने केले पाहिजे. परंतु दुर्दैवाने असे न होता तोडफोड केली. यामुळे आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयावरील भ्याड हल्ल्याचा निषेध आदिवासी सेवक डॉ. एन.डी. किरसान यांनी केला आहे.आदिवासींच्या संशोधनासाठी कार्यरत असलेल्या या कार्यालयात आदिवासींच्या संशोधनासंबधी माहिती, अनेक संदर्भ पुस्तके, सर्वेक्षण, मौल्यवान पुरावे, छायाचित्रे जतन करून ठेवलेली आहेत व संशोधनाचे कार्य अविरतपणे करण्याचे काम या संस्थेने केलेले आहे. ही संस्था आदिवासींची संस्कृती व ग्रंथाचे जतन करण्याचे काम करीत आहे..

ही संस्था गेली पन्नास वर्षे आदिवासींच्या संशोधनाचे कार्य करीत असून देशातील नामवंत संस्था म्हणून गौरविल्या गेलेली आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या संस्थेचा गौरव करण्यात आलेला आहे. तसेच या संस्थेस सरकारने स्वायत्तता दिलेली आहे. आदिवासींची संस्कृती व वैशिष्ट्ये जतन करणाऱ्या अशा संस्थांवरील हल्ला हा दुर्दैवी व निषेधार्थ आहे. या घटनेचा आम्ही संघटनेच्या माध्यमातून निषेध व्यक्त करीत असून सदर घटनेची पुन्हा चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. अशा प्रकारचे निवेदन गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांच्या नावे देण्यात आले.यावेळी आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ सचिव डॉ. एन. डी. किरसान, माजी सभापती श्रावण राणा, माजी सभापती हिरालाल फाफणवाडे, शिवानंद फरदे, सुभाष चुलपार, आंनद चजे, मोहन राऊत, टेकेश्वर सोयाम, विजय मडावी उपस्थित होते..