रोजगार सेवकांचे सडक अर्जुनीत बेमुदत उपोषण सुरू

0
16

सडक अर्जुनी,दि.30ःःमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची यशस्वी पद्धतीने अंमलबजावणी करण्याचे काम ग्रामरोजगार सेवकांच्या माध्यमातून होत असते. असे असले तरी ग्रामरोजगार सेवकांवर अन्याय होत असतो. अन्याय दूर करण्यात यावा तसेच मागण्यांची पूर्तता करण्यात यावी, यासाठी ग्रामरोजगार सेवक संघटना तालुका सडक अजुर्नीच्यावतीने २७ ऑगस्टपासून पंचायत समिती कार्यालय परिसरात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र, अद्यापही उपोषणाची दखल वरिष्ठांकडून घेण्यात आलेली नाही. बुधवार दि.29 रोजी प्रभारी गटविकास अधिकारी एस.टी.तुरकर,उपसभापती यांनी रोजगार सेवकांच्या उपोषण मंडपाला भेट देऊन चर्चा केली तसेच उपोषण मागे घेण्याची विनंती केली मात्र आंदोलक आपल्या मागण्यावर ठाम राहिले.मुनेश्वर उके,ऋषी मेश्राम,गुरुचरण टेंभुर्णे,हेमराज भेंडारकर,तालुकाध्यक्ष रामेश्वर नान्हे,सचिव धनराज वैद्य,संघटक देवचंद नागोसे यांच्यासह 30 ते 40 ग्रामरोजगार सेवक या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
ग्रामरोजगार सेवकांचे मानधन तात्काळ ग्रामपंचायत खात्यावर जमा करण्यात यावे, शासन निर्णयानुसार ग्रामरोजगार सेवकांवर कार्यवाही ही कोणत्याही राजकीय दबावाखाली करण्यात येऊ नये, तसेच ग्रामपंचायत खाडीपार येथील ग्रामरोजगार सेवक मुनेश्‍वर उके याच्या निलंबनाचे पत्र रद्द करुन निर्दोष असल्याचे पत्र देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह ग्रामरोजगार सेवकांवर होणारा अन्याय दूर करण्यात यावा याकरिता १0 तारखेपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. तर मागण्यांकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने २७ ऑगस्टपासून पंचायत समिती कार्यालयासमोर भरपावसात ग्रामरोजगार सेवकांनी आमरण उपोषण सुरू केले.