डॉ. बंग दाम्पत्याला फिक्कीचा ‘हेल्थकेअर ह्युमनिटेरियन’ पुरस्कार

0
22

गडचिरोली,दि.३1: जिल्ह्यातील आदिवासींच्या आरोग्यासाठी निष्काम भावनेतून काम करणाऱ्या डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग दाम्पत्याला फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री(फिक्की) म्हणजेच भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाच्याच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘हेल्थकेअर ह्युमनिटेरियन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दिल्ली येथे ‘फिक्की’द्वारे आयोजित दहाव्या ‘हेल्थकेअर एक्सिलंस’ पुरस्कार व परिषदेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.महासंघाचे सरचिटणीस दिलीप चिनॉय, कोकिलाबेन रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्राच्या अध्यक्ष टीना अंबानी, केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल आणि दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

आरोग्यसेवेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी २००९ पासून भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाद्वारे ‘हेल्थकेअर एक्सिलंस’ पुरस्काराला सुरुवात करण्यात आली. दशकभरापासून हा वारसा पुढे जात आहे. यंदाचे या पुरस्काराचे दहावे वर्ष आहे. आदिवासी भागात केवळ आरोग्यसेवाच न देता, त्यांच्या आरोग्याच्या समस्या कशा कमी करता येतील, यासाठी सातत्याने संशोधन करण्याचे काम डॉ. बंग दाम्पत्य ३२ वर्षांपासून करीत आहे. भारतातील सार्वजनिक आरोग्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे. दुर्गम आणि ग्रामीण भागातील नवजात बाळांना आरोग्यसेवा, बालमृत्यू आणि स्त्री आरोग्याच्या समस्या याबाबत त्यांनी तयार केलेला उपक्रम आज देशातील विविध राज्ये व पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश आणि अनेक आफ्रिकन देशांमध्ये राबविण्यात येत आहे. याच कार्याची दाखल घेत डॉ. बंग दाम्पत्याला उपरोक्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दोघांच्या वतीने डॉ. अभय बंग यांनी हा पुरस्कार स्वीकारला.