‘गोसे’च्या कालव्यात पती-पत्नीची आत्महत्या

0
8

पवनी,दि.01ः- गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात पती-पत्नीने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
राकेश ईश्‍वर आंबाडारे (२८) व सपना राकेश आंबाडारे (२२) रा. कोरंभी असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी राखीनिमित्त सपना व राकेश हे उमरेड तालुक्यातील शेडेश्‍वर येथे दुचाकी क्र मांक एमएच ३६ यु ९५६८ ने गेले होते. शुक्र वारी दुपारी ३ वाजता ते कोरंभी येथे येण्यासाठी निघाले. परंतु, कोरंभी येथे पोहोचलेच नाही. दरम्यान, शुक्र वारी सकाळी एकाला गोसेच्या उजव्या कालव्यात सपनाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. त्याने ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सपनाचा मृतदेह बाहेर काढला. परंतु, राकेशचा कुठेच थांगपत्ता नव्हता.
कालव्याशेजारी राकेशची दुचाकी, कपड्याची बॅग, पर्स, मोबाईल फोन आढळून आले. त्यामुळे या घटनेबाबत तर्कवितर्क सुरू होते. परंतु, बरीच शोधाशोध केल्यानंतर संध्याकाळी सपनाचा मृतदेह आढळल्याच्या ५0 मिटरवर राकेशचाही मृतदेह तरंगताना आढळून आला. त्यामुळे दोघांनीही आत्महत्या केल्याचे बोलले जाते.
राकेश आणि सपना यांचे लग्न फेब्रुवारी २0१८ मध्ये झाले होते. नव्यानेच संसार सुरू असताना अचानक त्यांनी आत्महत्या केल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यांच्या आत्महत्येचे कारण शोधून काढणे पवनी पोलिसांसमोर आव्हान ठरले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.