पुन्हा एका गरोदर मातेचा मृत्यू

0
6

गडचिरोली,दि.01 : कोरची तालुक्यातील कोडगुल प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येत असलेल्या ग्यारापती आरोग्य पथकातील मोठाझेलीया येथील सुनिता मूलचंद गोटा या पाच महिन्याच्या गरोदर मातेचा 26 ऑगस्टला पोटातच बाळ दगावल्याच्या कारणामुळे मृत्यू झाला. अशी माहिती कोरची येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद मडावी यांनी दिली. मडावी म्हणाले, गरोदर माता मृत्यूची ही तिसरी घटना असून एकाच महिन्यातील आहेत. या तीन गरोदर महिलांना मृत्यूने कवटाळल्याने कोरची तालुक्यात खळबळ माजलेली आहे.कोरची तालुक्यातील अति दुर्गम आदिवासी भागात असलेल्या लोकांना चांगली आरोग्य सेवा मिळण्यासाठी शासनाने कोरची येथे एक ग्रामीण रुग्णाल तसेच बोटेकसा, कोडगूल ही दोन प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केली आहेत. त्यांना जोडूनच मसेली, बेतकाठी, ग्यारापती, ही तीन प्राथमिक आरोग्य पथक व जिथे वरील आरोग्य सेवेचा उपयोग होत नाही तिथे आरोग्य सेवेचा उत्तम पर्याय ठरावा म्हणून नवेझरी, कोटरा, कोहका (बेळगाव घाट) या ठिकाणी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आरोग्य विभागाला 2014 पासून प्रति शिबिर 18 हजार रुपये शासनाकडून अनुदान दिले जाते. शिबीरे झाल्याचा खर्च कागदोपत्री दाखवून लाखो रुपयांचा निधी लाटला जात असल्याची बाब समोर आली आहे. या संपूर्ण विभागाची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झालेली आहे. जिल्ह्यातील आदिवासी लोकांचा मानव निर्देशांक दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी असलेली योजना ही जिल्ह्यातील आरोग्याधिकारी व तालुक्यातील वैद्यकिय अधिकारी यांच्याच मानव निर्देशांक वाढवत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पंचायत समितीच्या सभापती काटेंगे यांनी केली आहे.