पाण्याचा कार्यक्षम वापर अभियानाचा ४ सप्टेंबर रोजी शुभारंभ

0
4
  • जिल्ह्यातील ८४ गावांचा समावेश
  • नाबार्डचा पुढाकार

वाशिम, दि. ०2 : राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डच्यावतीने पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी राज्यस्तरीय अभियान हाती घेण्यात आले आहे. यानिमित्ताने ४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा या अभियानाचा शुभारंभ करून पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी जनजागृती करणाऱ्या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवतील.

या अभियानाची सचित्र माहिती असलेला चित्ररथ जिल्ह्यातील ८४ गावांमध्ये शेतकऱ्यांमध्ये तुषार सिंचन, ठिबक सिंचन व मडक्याच्या सहाय्याने सिंचन करून पाण्याच्या कार्यक्षम वापर करण्याबाबत जनजागृती करणार आहे. राज्यात उपलब्ध असलेल्या पाण्यापैकी ८० टक्के पेक्षा अधिक पाण्याचा वापर हा कृषि क्षेत्रासाठी होतो. त्यानुसारच या विषयावरील अभियानाची निवड करण्यात आली आहे. उपलब्ध पाण्याचा वापर करून अधिकाधिक कृषि क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरणार आहे.जिल्ह्यातील ८४ गावांमध्ये जलसाक्षरतेबाबत या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती होण्यास मदत होणार आहे. पावसाच्या पाण्याचा वापर, पावसाचे पाणी साठवणे, भूजल पुनर्भरण आणि जलव्यवस्थापनामध्ये समाजाचा सहभाग आदींवर या अभियानात भर देण्यात आल्याची माहिती नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक विजय खंडरे यांनी दिली.