पोलिस उपनिरिक्षकाचा गडचिरोलीत आत्महत्येचा प्रयत्न

0
7

गडचिरोली,दि.03: बदली होऊनही भारमुक्त न केल्याने एका पोलिस उपनिरीक्षकाने मानसिक तणावातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना चामोर्शी तालुक्यातील घोट पोलिस मदत केंद्रात (दि.1) संध्याकाळी घडली. सुरेश जायभाये, असे जखमी उपनिरीक्षकाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश जायभाये हे काल घोट पोलिस मदत केंद्रातील एका खोलीत होते. त्यावेळी, काही कर्मचारीही तेथे उपस्थित होते. मात्र, ते मानसिक तणावात दिसत होते. काही क्षणातच त्यांनी तीक्ष्ण अवजाराने आपल्या हाताची नस कापली. चार ठिकाणी त्यांनी कापून घेतले. लगेच त्यांना घोट येथील एका खासगी दवाखान्यात नेण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

पोलिस उपनिरीक्षक जायभाये हे दोन वर्षे घोट पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. परंतु यंदा जानेवारी महिन्यात पोलिस उपनिरीक्षक कु.राजपूत यांच्याकडे प्रभारी अधिकारीपदाचा कार्यभार सोपविण्यात आला. अशातच काही दिवसांपूर्वी जायभाये यांचे स्थानांतरण झाले. परंतु बरेच दिवस लोटूनही त्यांना भारमुक्त करण्यात आले नाही. त्यामुळे ते मानसिक तणावात होते. विशेष म्हणजे, काल घटनेच्या वेळी प्रभारी अधिकारी कु.राजपूत सुटीवर गेल्या होत्या. त्यांनी पीएसआय शिंदे यांच्याकडे प्रभार सोपविला होता.