शेतकऱ्यांनी कापसाची लागवडच तंत्रशुद्ध पद्धतीने केल्यास बोंडअळी येणार नाही – कुलगुरू डॉ. अशोक ढवण

0
11

नांदेड दि. 3 -शेतकऱ्यांनी कापसाची लागवड करताना घालून दिलेल्या नियमानुसार केल्यास कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव येणारच नाही. शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस कृषी विद्यापीठ त्यांच्या समस्येचे निराकरण करण्यास कटिबद्ध आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या संपर्कात राहून शास्त्रज्ञांची मदत घ्यावी, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी काल कुसुम सभागृह नांदेड येथे आयोजित सहकार महर्षी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंती व शेतकरी दिनाच्या निमित्ताने कपाशीवरील गुलाबी बोंडआळी व्यवस्थापन शेतकरी कार्यशाळा, मार्गदर्शन मेळावा व प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव सोहळ्यानिमित्त कार्यक्रमात बोलताना आपले मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अरूण डोंगरे तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील, मराठा सेवा संघाचे केंद्रिय कार्यकारिणी सदस्य डॉ. पंजाबराव चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब कदम, डॉ. विजय भरगंडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी संतोष नादरे, पंडितराव मोरे, मराठा सेवा संघाचे इंजि. शे.रा. पाटील,प्रा. संतोष देवराये, डॉ. सोपानराव क्षीरसागर, नानाराव कल्याणकर, कृषी परिषदेचे प्रा. विवेक सुकणे, चक्रधर पाटील, कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. खिजर बेग, डॉ. पुरूषोत्तम झंवर, जि.प. सदस्य विजय बास्टेवाड, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा सुरेखाताई रावणगावकर, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शाम पाटील, भगवान कदम, कृषीरत्न पुरस्कारप्राप्त डॉ. अंकुश देवसरकर, ऍड. बालाजी शिरफुले, संयोजक भागवत देवसरकर आदी विचारपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना ढवण यांनी शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय करावा. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून अधिक कालावधीच्या पिकांचा मोह टाळावा. कृषी अधिकारी व कर्मचारी यांच्या संपर्कात शेतकरी बांधवांनी राहून शेती करावी, असे सांगून देशांतर्गत बाजारपेठ मोठी आहे. त्यामुळे बाजाराच्या हालचालीकडे शेतकऱ्यांनी बारीक लक्ष ठेवावे. कापसाची पल्हाटी डिसेंबरअखेर उपटून पलाटीचा नायनाट करावा. जेणेकरून बोंडअळीचे उच्चाटन पोलिओसारखेच होईल, असेही त्यांनी सांगितले. अध्यक्षस्थानाहून बोलताना जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी कामगंध सापळे याचा वापर करावा. जिल्ह्यात कृषी विभाग व जिल्हा परिषदेच्या मदतीने बोंडअळी नियंत्रणात आणण्यासाठी विशेष जनजागृती मोहिम राबवून वेळोवेळी बैठका घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा निश्चित प्रयत्न केला. भविष्यातही शेतकऱ्यांच्या पाठीशी जिल्हा प्रशासन खंबीरपणे राहील, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील उदाहरणे देऊन शेतकऱ्यांना संकटाशी सामना करण्याचे मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांबद्दल माहिती देताना शेतकऱ्यांना आधुनिकतेची कास धरण्यास सांगितले व बोंडअळी संदर्भात गावपातळीपर्यंत नियोजन करून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांच्या समस्येचे निराकरण केले. यावेळी उपस्थितांना डॉ. प्रदीप इंगोले, कामाजी पवार, डॉ. पुरूषोत्तम झंवर, खिजर बेग यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. प्रास्ताविकामध्ये संयोजक भागवत देवसरकर यांनी कार्यक्रमामागची भूमिका विषद करून शेतकऱ्यांच्या अडीअडचणीत कृषी परिषद त्यांच्या भक्कम पाठीशी उभी राहीन, अशी ग्वाही दिली.
यावेळी कृषीरत्न पुरस्कारांचे वितरण डॉ. अंकुश देशसरकर, ऍड. बालाजी शिरफुले व जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, कामगंध सापळे व सुरक्षा किट देऊन गौरव करण्यात आला. कृषी विभागात सेवा बजावून सेवानिवृत्त झाल्याबद्दल जिल्हा कृषी विकास अधिकारी पंडितराव मोरे, कृषी अधिकारी जाधव, मंडळ कृषी अधिकारी शिनगारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना कामगंध सुरक्षा सापळ्यांचे मोफत वाटप कृषी परिषदेच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनंजय पाटील, शंकरराव पवार निवघेकर, रवी ढगे, तिरूपती पाटील भगनुरे, विनीत पाटील, प्रशांत आबादार, रामदास माळेगावे, परमेश्वर काळे, दीपक पवार, सदाशिव पा. आरसुळे, मोतीराम पवार, सुनील पाटील, अनिल देवसरकर, दिनेश जाधव, मंगेश गवळी, शिवशंकर थोटे, सतीश चव्हाण, कपिल तडखिले, नामदेव नरवाडे, बालाजी पाटील, शिवराज पवार, संदीप पावडे, अमोल वाघीकर, बळवंत मोरे, बळवंत ताटे, भगवान पाटील, गंगाधर पवार निवघेकर आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास कृषी परिषदेचे परभणी जिल्हाध्यक्ष एकनाथ मोरे, हिंगोली जिल्हाध्यक्ष अविनाश वाघमारे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष गजानन पा.कदम, मराठा सेवा संघाचे उद्धव पा.सूर्यवंशी, प्रल्हाद दुरपुडे, सतीश जाधव, प्रा. प्रेमकुमार कौशल्ये यांच्यासह कृषी विभागातील कर्मचारी, अधिकारी, विद्यापीठातील शास्त्रज्ञ, जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ व विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून व जिजाऊ वंदना सुरेखा रावणगावकर यांनी गायिली. यावेळी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव रमेश पवार, जिल्हा उपाध्यक्ष रवी ढगे, आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष प्रशांत आबादार यांनी केले.