करिअर सोबतच सर्वांगिण विकासासाठी लोकराज्य उपयुक्त – खुमेंद्र बोपचे

0
20

 लोकराज्य वाचक अभियानाचा शुभारंभ
 स्पर्धा परीक्षेसाठी लोकराज्य महत्वपूर्ण
भंडारा, दि. 4:- शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकात शासकीय योजना, धेय्य व धोरणांच्या माहितीचा समावेश असतो. शासनाच्या विविध योजनांची एकाच ठिकाणी माहिती असलेले लोकराज्य हे एकमेव मासिक आहे. लोकराज्य हे स्पर्धापरीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे असून करिअर सोबतच सर्वांगिण विकासासाठी लोकराज्य मासिक उपयुक्त असल्याचे मत जिल्हा ग्रंथपाल खुमेंद्र बोपचे यांनी व्यक्त केले. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित लोकराज्य वाचक अभियानाचा शुभारंभ आज जिल्हा ग्रंथालय येथे करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते व संजय नारनवरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
जिल्हा ग्रंथालय कार्यालयात या उपक्रमाचा शुभारंभ लोकराज्य व महाराष्ट्र वार्षिकीचे प्रकाशन करुन करण्यात आला. यावेळी बोलतांना खुमेंद्र बोपचे म्हणाले की, लोकराज्य मासिकाचे स्वरुप हे शासकीय नसून ते माहितीपूर्ण आहे. लोकराज्य मासिकात शासनाच्या योजनांची व उपक्रमांची सविस्तर माहिती दिलेली असते. लोकराज्य हे देशात दुसऱ्या क्रमांकाच्या खपाचे मासिक ठरले आहे. स्पर्धा परीक्षेसाठी लोकराज्य मासिकाचा मोठया प्रमाणात फायदा होतो.
लोकराज्यने विविध विषयांवर विशेषांक काढले असून हे विशेषांक अतिशय लोकप्रिय झाले आहेत. स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या अनेक उमेदवारांनी आपल्या यशात लोकराज्यचा वाटा असल्याचे नमूद केले आहे. लोकराज्य वाचक अभियानात लोकराज्य घरोघरी पोहचविण्याची माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची मोहिम आहे. या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. स्पर्धा परीक्षार्थींनी अभ्यासकांची विविध पुस्तके वाचन करतांना लोकराज्य मासिकाला प्राधान्य दयावे, असे ते म्हणाले.
लोकराज्य मासिक हे महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे तर देशात दुसऱ्या क्रमांकाचे मासिक असून शासनाच्या योजनांची माहिती अधिकृतरित्या देणारे एकमेव मासिक आहे. लोकराज्य वाचक मेळाव्याच्या माध्यमातून नागरिक व विद्यार्थी यांच्या पर्यंत शासनाच्या योजना पोहचविण्याचा उद्देश असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांनी प्रास्ताविकात सांगितले. महाराष्ट्र वार्षिकी 2018 तसेच लोकराज्यच्या विविध विशेषांकामध्ये शासनाच्या सर्व योजना विविध विभागाची सखोल माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. लोकराज्य वाचक अभियानात या पुढेही विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या माध्यमातून लोकराज्य घरोघरी पोहचविण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लोकराज्य मसिकाचे विविध विशेषांक काढण्यात आले असून या विशेषांकात स्पर्धा परीक्षेची तयारी व त्या अनुषंगाने उपयुक्त माहिती देण्यात आली आहे. हे विशेषांक शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी या अंकाचा अभ्यास करुन आपले करिअर घडवावेत, असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन संजय नारनवरे यांनी केले.