स्वच्छ शाळा राष्ट्रीय पुरस्कारात सामाजिक न्याय विभागाच्या दोन शाळा अव्वल

0
10

मुंबई, दि. 4 (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयााने स्वच्छ शाळा पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या देशभरातील 52 शाळांपैकी राज्यातील दोन शाळांनी बाजी मारली असून पुरस्कारात अव्वल ठरलेल्या जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्याचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आले हा दुध शर्करा योग आहे याशब्दात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आज यासंबंधी पत्रकारांनी त्यांना विचारले असता त्यांनी स्वच्छ शाळा राष्ट्रीय पुरस्कारासंबंधी माहिती देत सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांचेही कौतुक केले.
विद्यार्थ्यांवर शालेय जीवनातच स्वच्छतेचे संस्कार रूजवण्यासाठी केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वतीने घेतलेल्या स्वच्छ शाळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दोन शाळा लातूर जिल्ह्यातील जाऊ (ता.निलंगा) व बावची (ता. रेणापूर) येथील सामाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या शासकीय निवासी शाळाअसून या शाळांना प्रत्येकी पन्नास हजार रूपयांचा पुरस्कार जाहिर झाला आहे. येत्या 18 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रांत या शाळांसोबत जिल्हा प्रशासनाचा पुरस्कार देऊन गौरव होणार असल्याचे बडोले यांनी सांगितले.
शालेय जीवनातच विद्यार्थ्यांत सामुहिक व वैयक्तिक स्वच्छतेची जागृती करण्यासाठी केंद्र सरकारने सप्टेंबर 2014 पासून स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय अभियान हाती घेतले आहे. या अभियानात शाळांनी राबवलेले स्वच्छतेचे उपक्रम आणि विद्यार्थ्यांत केलेल्या जागृतीची स्वतंत्र पथकामार्फत तपासणी करून पुरस्कारासाठी निवड केली जाते. सन 2017 – 2018 वर्षातील पुरस्कारासाठी देशभरातील हजारो शाळांनी सहभाग घेतला होता. यात राज्यातील 1 लाख 60  हजार 145 शाळांपैकी 27 हजार 179 शाळांनी नोंदणी करून
वीस हजार 602 शाळांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. स्पर्धेत देशभरातील 729 शाळा पात्र ठरल्या तर तपासणीनंतर 52 शाळांची पारितोषिकासाठी निवड झाली. स्पर्धेत देशात अव्वल आलेल्या नऊ जिल्ह्यांचीही पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून त्यात लातूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे ते म्हणाले.
पुरस्कारासाठी शंभर गुणांची स्पर्धा होती. यात शुद्ध पाण्यासाठी 22,स्वच्छतागृहाचा नियमित वापराला 28, हात धुण्याच्या सवयीला 20, स्वच्छतेच्या सुविधांच्या देखभाल दुरूस्तीला पंधरा तर विद्यार्थ्यांत झालेला स्वच्छतेबाबतचा वर्तन बदल आणि क्षमतेला पंधरा गुण आहेत. यात बावची शाळेला 93.6 तर जाऊ शाळेला 92.6 गुण मिळाले. दोन्ही शाळांनी विद्यार्थ्यांवर चित्रकला, निबंध आदी स्पर्धांतून स्वच्छतेचे संस्कार रूजवले. शोषखड्ड्यातून सांडपाणी जमिनीत मुरवले. कचऱ्याचे वर्गीकरण करून कंपोष्ट खत निर्मितीतून घनकचरा व्यवस्थापन केले. वृक्ष लागवड करून शाळांचा परिसर निसर्गरम्य केला , त्यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या या दोन शाळांना अव्वल स्थान मिळाले याचा राज्याल, लातूर जिल्ह्याला तसेच विभागाला रास्त अभिमान असून अशा उपक्रमात अधिकाधिक शाळांनी व विद्यार्थ्यांनी भाग घेऊन घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.