जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना विशेष अधिकार प्रदान

0
6

वाशिम, दि. ०४ :  जिल्ह्यात दि. ९ सप्टेंबर रोजी पोळा व दि. १० सप्टेंबर रोजी पोळाकर तसेच दि. १३ सप्टेंबर रोजी गणेश स्थापना होत आहे. त्याचबरोबर दि. २३ ते २५ सप्टेंबर २०१८ या कालावधीत शहरी व ग्रामीण भागात गणेश विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. दि. ११ ते २१ सप्टेंबर २०१८ या कालावधीत मुस्लीम बांधवांचा मोहरम उत्सव सर्वत्र साजरा होणार आहे. या काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व फौजदार व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांना महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३६ नुसार दि. ९ ते २५ सप्टेंबर २०१८ या कालावधीत विशेष अधिकार प्रदान करण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी कळविले आहे.

मिरवणूक अथवा जमावातील लोकांना कशा रीतीने चालावे याचे निर्देश देणे, मिरवणुकीचा मार्ग व वेळ विहित करणे, मिरवणूक अथवा उपासनेच्यावेळी अडथळा होवू न देणे, सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणे, सार्वजनिक ठिकाणी अथवा रस्त्यांवर गाणी, वाद्ये वाजविणे किंवा ध्वनीक्षेपकाचा उपयोग करण्याचे विनियमन करणे, त्यावर नियंत्रण ठेवणे तसेच सक्षम प्राधिकारी यांनी कलम ३३, ३५, ३७ ते ४०, ४२, ४३, व ४५ या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देण्याचे अधिकार जिल्ह्यातील सर्व फौजदार व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांना दि. ९ ते २५ सप्टेंबर २०१८ या कालावधीत प्रदान करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३४ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे पत्रकात म्हटले आहे.