पोलिसांवर हल्ला करणारे सहा रेती तस्कर जेरबंद

0
17

भंडारा,दि. 4:- : : रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस पथकावर जीवघेणा हल्ला करुन गत महिनाभरापासून पसार असलेल्या मुख्य आरोपीसह सहा रेती तस्करांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सोमवारी यश आले. मोहाडी पोलिसांच्या आरोपी ताब्यात असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक २ आॅगस्टच्या रात्री रोहा परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी दोन रेती ट्रॅक्टर पोलिसांनी रोखले. त्यावरून झालेल्या वादात सहाय्यक पोलीस निरीक्षक पुसाटे व पथकातील हवालदार सुधीर मडामे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या घटनेने पोलीस वर्तूळात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी मुख्य आरोपी विश्वनाथ बांडेबुचे, मार्कंड बळीराम बांडेबुचे, दीपक बांडेबुचे, कमलेश बांडेबुचे, जनार्दन उर्फ सोनू तितीरमारे, राजेश ओंकार आगाशे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
दरम्यान घटनेपासून सर्व आरोपी पसार झाले होते. पोलिसांनी विविध सहा पथके तयार करून त्यांचा शोध सुरु केला. दरम्यान आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली. तेथेही जामीन मिळाला नाही. पोलिसांनी शोध जारी केला असता यातील मुख्य आरोपी विश्वनाथ बांडेबुचे घरी येत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही.एम. पोटे, पोलीस उपनिरीक्षक गदादे यांनी त्याच्या घरी धाड टाकली. यावेळी आरोपी विश्वनाथ बांडेबुचे हा घरातील संडासच्या वरील सज्ज्यात लपून असल्याचे दिसून आले. त्याला जेरबंद करण्यात आले. त्याच्याकडून माहिती घेतली असता आरोपी मार्कंड बळीराम बांडेबुचे व दीपक बळीराम बांडेबुचे हे तुमसर तालुक्यातील लोभी येथे असल्याची माहिती मिळाली. त्याला तेथून अटक करण्यात आली. तर आरोपी राजेश ओंकार आगाशे व जनार्दन उर्फ सोनू ईस्तारी तितीरमारे याला मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील कुंभली येथून अटक करण्यात आली. मात्र या प्रकरणातील एक आरोपी कमलेश बांडेबुचे यालाही मंगळवारी अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रश्मी नांदेडकर, गृह विभागाचे उपअधीक्षक बी. डी. बनसोडे, पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पोटे यांनी केली.