राष्ट्रवादी काँग्रेसने केला पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध

0
11

गोंदिया,दि.05 : पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. तर केंद्र सरकारने खतांच्या किमतीत वाढ केल्याने शेतकºयांना शेती करणे तोट्याचे झाले आहे. त्यामुळे या दरवाढीचा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध व्यक्त केला तसेच ही दरवाढ त्वरीत मागे घेण्याची मागणी केली. तसेच यासंबंधिचे निवेदन मंगळवारी (दि.४) खासदार मधुकर कुकडे यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांना देण्यात आले.
पाल चौक येथील कार्यालयातून वाढत्या महागाईच्या विरोधात निषेध रॅली काढण्यात आली. शहरातील मुख्य मार्गावरुन ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचली. या वेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पेट्रोल, डिझेल व खतांच्या वाढत्या किमतीचा निषेध नोंदविला. भाजप सरकारने जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून त्यांची दिशाभूल केली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, खते आणि इतर जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने सर्व सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, जनता सर्वच त्रस्त झाले आहे. सरकारने ही दरवाढ त्वरीत मागे घ्यावी, तसेच जीवनाश्यक वस्तूंचे दर कमी करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली. शिष्टमंडळात माजी आमदार दिलीप बन्सोड, प्रदेश महासचिव विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन, विनोद हरिणखेडे, देवेंद्रनाथ चौबे, गंगाधर परशुरामकर, मनोहर चंद्रिकापुरे, अशोक गुप्ता, अशोक सहारे, शिवकुमार शर्मा, राजलक्ष्मी तुरकर, प्रभाकर दोनोडे, केतन तुरकर, प्रेमकुमार रहांगडाले, कमल बहेकार, किशोर तरोणे, महेश जैन, मनोज डोंगरे, दुर्गा तिराले, विनित शहारे यांचा समावेश होता.