खेळांमुळे एकतेची भावना निर्माण होते – पोलीस अधीक्षक बैजल

0
13

गोंदिया,दि.05ः- पोलीस कर्मचार्‍यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावे, म्हणून दरवर्षी पोलीस कर्मचार्‍यांसाठी क्रीडा स्पधार्चे आयोजन होत असून, यातून अनेक कर्मचारी राज्य व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचत आहेत. खेळातील सहभागामुळे त्यांच्यात एकतेची भावना निर्माण होत असून त्याचे सकारात्मक परिणाम त्यांच्या कामावर होत असल्याने प्रत्येकाने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक हरीश बैजल यांनी केले.
पोलिस मुख्यालय कारंजा येथे ३१ ऑगस्टपासून आयोजित जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला अप्पर पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, पोलिस उपअधीक्षक सोनाली कदम, गोंदिया उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते, आमगाव उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले, पोलिस उपअधीक्षक महिपालसिंग चांदा, राखीव पोलिस निरीक्षक कमलाकर घोटेकर, पोलिस उपनिरीक्षक दीपक गेडाम तसेच जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे म्हणाल्या, जीवनात आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी व सकारात्मक विचारसरणीसाठी खेळ उपयुक्त ठरतो. त्यामुळे खेळ स्पर्धेपुरता र्मयादित न राहता दैनंदिन जीवनात प्रत्येकाने एक तरी खेळ नियमीत खेळण्याचे आवाहन केले. या स्पर्धेत गोंदिया महिला व पुरुष पोलिस मुख्यालय संघ, बेस्ट अँथलेटिक्स म्हणून पोलिस मुख्यालयाचे आशिष मेर्शाम, लता हत्तीमारे हे खेळाडू विजेते ठरले असून हे खेळाडू वर्धा येथे आयोजित परिक्षेत्रीय स्पर्धा व नागपूर येथे होणार्‍या राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. संचालन मंजुषी देशपांडे यांनी केले तर आभार पोलिस उपअधीक्षक सोनाली कदम यांनी मानले. स्पर्धेच्या आयोजनासाठी पोलिस उपअधीक्षक सोनाली कदम, पोनि कमलाकर घोटेकर, दीपक गेडाम, पोलिस मुख्यालयाचे डीआय स्टॉफ आदींनी परिश्रम घेतले.