सर्वच क्षेत्रातील दिव्यांग आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करा- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

0
27

 सडक/अर्जुनी येथे भव्य दिव्यांग मेळावा
 २३१७ दिव्यांगांना साहित्य वाटप
गोंदिया,दि.६ : दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने विविध क्षेत्रात आरक्षण दिले आहे. या आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी केल्यास दिव्यांग बांधवांचा आर्थिक, सामाजिक विकास होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोन समाजाने सकारात्मक ठेवावा, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
सामाजिक न्याय विभाग, जिल्हा परिषद, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम व जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयटीआय सभागृह, सडक/अर्जुनी येथे आयोजित दिव्यांग व्यक्तींना नि:शुल्क सहाय्य उपकरणे वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांनी दीप प्रज्वलन करुन केले. याप्रसंगी ना. रामदास आठवले व ना. राजकुमार बडोले यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींना प्रातिनिधीक स्वरुपात विविध साहित्याचे वाटप करण्यात आले.
पालकमंत्री राजकुमार बडोले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष हमीद अल्ताफ अकबरअली, जि.प. समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, महिला व बाल कल्याण समिती सभापती लता दोनाडे, पं.स.सभापती गिरिधर हत्तीमारे, उपसभापती राजेश कठाणे, नगराध्यक्ष देवचंद तरोणे, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, प्रादेशिक उपायुक्त डॉ.सिध्दार्थ गायकवाड, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण मंगेश वानखेडे, समाजकल्याण अधिकारी मिलींद रामटेके, एलिम्को कंपनीचे उपमहाप्रबंधक अजय चौधरी व जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.
मागील चार वर्षात केंद्र सरकारने देशभरात ७ हजार शिबीर घेवून १० लाख दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप केल्याचे आठवले यांनी सांगितले. दिव्यांग व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोन समाजाने बदलण्याची गरज असल्याचे सांगून आठवले म्हणाले की, दिव्यांगाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी सामाजिक न्याय विभाग सातत्याने प्रयत्न करीत आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या पुढाकाराने आयोजित आजचा साहित्य वाटप कार्यक्रम त्याचाच एक भाग आहे. हे साहित्य वाटप प्रातिनिधीक स्वरुपात असले तरी जिल्हयातील एकही दिव्यांग व्यक्ती साहित्यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेतली जाईल.
दिव्यांग बांधवाच्या विकासासाठी असलेला विविध योजनेतील निधी तीन टक्कयावरुन पाच टक्के करण्यात आला आहे. झिरो पेंडन्सीअंतर्गत जिल्हयातील अपंग बांधवांना शंभर टक्के प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे. दिव्यांग खेळाडूंना थेट नोकरी देण्याचा निर्णय शासन घेत आहे. दिव्यांगासाठी विभागीय स्तरावर सर्व ठिकाणी कौशल्य विकास केंद्र व विशेष आयटीआय स्थापन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेत दिव्यांगाना सहाशे रुपयांऐवजी हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी यावेळी दिली.
दिव्यांग व्यक्तीसाठी सामाजिक न्याय विभागाने विविध कल्याणकारी योजना राबविल्या असून दिव्यांग शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावले आहे. दिव्यांगांची विशेष शाळा संहिता लागू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग धोरणाची योग्य अंमलबजावणी महाराष्ट्रात सुरु आहे. कायम विना अनुदानित मधील कायम हा शब्द वगळण्यात येणार असून दिव्यांग व्यक्तींच्या विकासासाठी महाराष्ट्रात दिव्यांग विकास प्रतिष्ठान स्थापन करण्यात येणार असल्याचेही बडोले यांनी यावेळी सांगितले.
आजचे साहित्य वाटप प्रातिनिधीक स्वरुपात असले तरी २३१७ दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या त्यांच्या तालुक्यात साहित्य वाटप करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून दिव्यांग साहित्य वाटप कार्यक्रम कौतुकास्पद असल्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष हमीद अल्ताफ अली यांनी सांगितले. एलिम्को कंपनी ३५० पेक्षा जास्त उपकरणाचे उत्पादन करते असे सांगून अजय चौधरी म्हणाले की, ही उपकरणे उच्च दर्जाची असून त्याचा वापर कसा करावा याबाबत कंपनीच्या प्रतिनिधीकडून सविस्तर माहिती करुन घ्यावी. त्याचप्रमाणे कंपनी दिव्यांग व्यक्तींना मोफत साहित्य वितरीत करीत असून यासाठी अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या मेळाव्यात साहित्य वाटप करण्यात आले. २८ मोटराईज्ड ट्रायसिकल, ६५८ ट्रायसिकल, ३४७ फोल्डींग व्हील चेअर, २० सि.पी. चेअर, ९५४ बैसाखी, ४६३ वाकिंग स्टिक, ११ बेल किट, ९ ब्रेल केन, १०१ स्मार्ट केन, ५०० श्रवणयंत्र, ४४७ एमएसआयडी किट, ३६ रोलेटर, २५ एडीएल किट, १९ डेजी प्लेअर, ३५९ कृत्रिम अंग असे आहे.
गोंदिया जिल्हयात ४ ठिकाणी शिबीरे घेण्यात आली होती. या शिबीरात ६ हजार व्यक्तींनी सहभाग घेतला. त्यापैकी २३१७ दिव्यांग व्यक्तींना १ कोटी ७२ लाख १० हजार रकमेचे एकूण ४०६७ साहित्य मंजूर करण्यात आले. हे साहित्य आज वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजकल्याण अधिकारी मिलींद रामटेके यांनी केले. उपस्थितांचे स्वागत अंध व दिव्यांग मुलांच्या स्वागत गिताने करण्यात आले. या कार्यक्रमास दिव्यांग बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.