राफेल घोटाळ्याविरुद्ध भंडाऱ्यात जनआंदोलन-नाना पटोले

0
21
भंडारा,दि.07ः- सध्या देशभर गाजत असलेल्या राफेल घोटाळ्याविरुद्ध काँग्रेसने कंबर कसली आहे. राफेल विमान खरेदीमध्ये झालेला भ्रष्टाचार, वाढती महागाई, बेरोजगारी याबाबत केंद्र व राज्य सरकारला उघडे पाडण्यासाठी १८ सप्टेंबर रोजी भंडारा येथे मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.पत्रकारपरिषदेला काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल गुडघे पाटील, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, माजी आमदार आनंदराव वंजारी, जि.प. अध्यक्ष रमेश डोंगरे, प्रदेश महासचिव जिया पटेल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर, माजी जिल्हाध्यक्ष मधुकर लिचडे, भंडारा जिल्हा प्रभारी सुरजित पठाण, तालुकाध्यक्ष राजकपुर राऊत, शहराध्यक्ष सचिन घनमारे यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पटोले म्हणाले, ‘मनमोहन सिंग यांच्या काळात राफेल खरेदीचा सौदा करण्यात आला. त्यावेळी विमानाची किंमत ५२४ कोटी रुपये होती. आताच्या केंद्र सरकारने ही खरेदी १ हजार ६७० कोटींमध्ये केली आहे. त्यातही उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कंपनीला या विमानाचे कंत्राट दिले आहे. अनुभवी कंपन्यांना विमानाचे कंत्राट देण्याचा नियम असताना अलीकडेच सुरू झालेल्या कंपनीला हे कंत्राट दिले गेल्याने यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. देशाच्या सुरक्षेसोबत छेडछाड करण्याचा हा प्रकार आहे’, असा आरोप पटोले यांनी यावेळी केला. ‘राफेल विमान खरेदीची बाब गोपनीय असल्याचे संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन सांगतात. तर, ज्या देशातून हे विमान खरेदी करण्यात आले त्या फ्रान्समधील अधिकारी यात काहीही गोपनीय नसल्याचे स्पष्ट करतात. म्हणजेच केंद्र सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे’, असे पटोले म्हणाले.
पेट्रोल व डिझेलचे भाव दररोज वाढत असून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले जात आहे. भारतातून मलेशियासारख्या लहान देशांना पेट्रोल-डिझेलची निर्यात केली जाते. ही निर्यात ३४ ते ३८ रुपयांपर्यंत असताना भारतात मात्र पेट्रोल व डिझेल त्यापेक्षा अडीच पटीने विकले जाते. ही जनतेची लूट आहे. मुंबईचे आमदार राम कदम यांनी महिलांच्या बाबतीत केलेल्या वादग्रस्त विधानावर नाना पटोले यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्यावर ताशेरे ओढले. ज्या कार्यक्रमात कदम यांनी हे वक्तव्य केले त्या कार्यक्रमास मुख्यमंत्रीही उपस्थित होते. भाजप आणि संघ हे मनुस्मृती मानत असल्याने महिलांचा अपमान करणे, हा त्यांचा अजेंडा असून राम कदम यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पटोले यांनी यावेळी केली. या सर्व मुद्यांना घेऊन सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी १८ सप्टेंबर रोजी भंडारा येथे मोर्चा काढण्यात येणार असल्याचे पटोले म्हणाले.