एकहाती सत्तेसाठी कामाला लागा; उद्धव ठाकरेंचा सेनेच्या आमदारांना आदेश

0
7

मुंबई- राज्यातील जनतेच्या प्रश्नांशी तडजोड करू नका. शेतकर्‍यांची मदत करा. तसेच भविष्यात एकहाती सत्ता हवी असेल तर आतापासूनच कामाला लागा, असे आदेश वजा सूचना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षांचे आमदार आणि मंत्र्यांना दिल्या. सरकारच्या योग्य कामांना पाठिंबा देवू. परंतु, जिथे विरोध करायचा तिथे विरोध करू असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
भूसंपादन विधेयकाविषयी शिवसेनेच्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी आज (बुधवारी) उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावली होती. जनतेच्या प्रश्नांबाबत कदापी तडजोड करू नका. शेतकर्‍यांना अधिकार असो, वा नसो त्यांना मदत करा. भविष्यात एकहाती सत्ता हवी असेल तर आत्तापासून कामाला लागा, असे आदेश उद्धव यांनी पक्षाचे आमदार आणि मंत्र्यांना दिल्या.

दरम्यान, उद्धव ठाकरें यांनी यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी या विषयी चर्चा केली आहे. शिवसेनेचा कशाला विरोध आहे, हे गडकरींच्या निदर्शनास आणून दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. आमदारांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संबोधित केले.
भूसंपादन विधेयकाबाबत केंद्र सरकारला पत्र लिहिणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.

तसेच याशिवाय येत्या अधिवेशनात सर्व आमदारांनी पूर्ण वेळ उपस्थित राहण्याचा सल्लाही उद्धव यांनी दिला. राज्यातील ज्या जमिनींचे अधिग्रहण झालेले आहे, त्यापैकी किती जमिनींवर प्रकल्प उभे राहिले, किती जणांना मोबदला मिळाला तसेच लोकांचे योग्य पुनर्वसन झाले की नाही, याबाबत चाचपणी करण्‍याच्या सूचना देखील उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिले.

दरम्यान, यापूर्वी मुंबईचा विकास आराखडा हा सामान्य लोकांच्या हिताचा नसेल तर तो चुलीत घाला, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपला दम दिला होता. आधी खातीवाटप, नंतर एलईडी, नाईटलाईफ आणि आता मुंबईचा विकास आराखड्यावरुन शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा जुंपण्याची शक्यता आहे.