योजना येणार एका छताखाली धोरणाच्या अंमलबजावणीसाठी झाले व्यापक नियोजन

0
16

गोंदिया,दि.७ : ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना या एका छताखाली आणण्यात येतील. प्रत्येक जिल्हयाच्या सामाजिक न्याय भवनामध्ये स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या प्रवर्गातील नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक कल्याण निधी स्थापन करण्यात येणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिक धोरणाबाबतच्या शासनाच्या विविध विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक समितीची बैठक नुकतीच मुंबईत घेण्यात आली. या बैठकीला ज्येष्ठ नागरिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव बिपीन मलिक, समाज कल्याण आयुक्त मिलींद शंभरकर, ज्येष्ठ नागरिक कृती समितीचे पदाधिकारी व विविध विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिकांचा वृध्दापकाळ चांगल्या तऱ्हेने जावा, समाजामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुसह्य व्हावे, शारिरिक, मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे, त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळण्यासाठी शासनाने ज्येष्ठ नागरिक धोरण जाहिर केले आहे. या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी सर्व विभागांनी करावी, असे निर्देशही बडोले यांनी दिले.
प्रतिसाद ॲप येणार
निराधार व गंभीर आजार असलेल्या स्वयंसेवी संस्था यांनी मदत करण्यासाठी शासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळविण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करुन आपत्कालीन सतर्क करणार यंत्रणा विकसित करण्यात येईल. यासाठी प्रतिसाद ॲप सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल. पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांवर मैत्रीपूर्ण लक्ष ठेवावे. ज्येष्ठ नागरिकांचा विद्यापीठे, ग्रंथालय, संशोधन संस्था आणि सांस्कृतिक केंद्रे यांच्याशी संपर्क व सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. राष्ट्रीय दिवसांच्या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात येईल.
कल्याण निधी मिळणार
वृध्दासाठी असणाऱ्या सर्व योजना एकाच छताखाली आणून त्या योजनांचा लाभ संबंधित वृध्दांना देण्यासाठी प्रत्येक जिल्हयाच्या सामाजिक न्याय भवनामध्ये स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक कक्ष निर्माण करण्यात येईल. वृद्वाश्रमाची नोंदणी, मुल्यांकन, सनियंत्रण व त्यांना सहाय्य यासाठी लवकरच नवीन धोरण तयार करण्यात येईल. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्थापन करण्यात येईल. शासनाच्या प्रत्येक विभागाने ज्येष्ठ नागरिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचे निर्देशही बडोले यांनी दिले.