जलयुक्त शिवार : पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

0
14

गोंदिया दि.७ : : राज्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत प्रसिद्धीसाठी बातमीदार, माध्यम प्रतिनिधींना जिल्हा, विभाग आणि राज्यस्त‍रावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी १२ सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका जिल्हा माहिती कार्यालयात सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा‍ माहिती अधिकारी यांनी केले आहे.२०१९ पर्यंत राज्य टंचाईमुक्त करण्यासाठी शासनाने २०१४ पासून जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानाच्या अनुषंगाने उत्कृष्ट लिखाणाद्वारे वृत्तपत्रातून जलसंधारणाचे महत्त्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणाऱ्या पत्रकारास पुरस्कार देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी बातमीदारांनी १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीतील प्रकाशित झालेले साहित्य तीन प्रतीत सादर करावे..

आपल्या लिखाणाद्वारे वृत्तपत्रातून जलसंधारणाचे महत्त्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणारे पत्रकार आणि जलयुक्त शिवार अभियानाची त्या-त्या परिसरातील जनजागृती, अभियानात लोकसहभाग वाढविणे, पाण्याचा ताळेबंद व कार्यक्षम वापर, पाणलोटच्या यशोगाथा प्रकाशित करणे, इतर गावांना प्रोत्साहित करुन पाणी प्रश्न सोडविण्यात योगदान देणारे पत्रकार या पुरस्कारासाठी पात्र राहील. जिल्हा स्तरावरील पुरस्काराची निवड जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या समितीद्वारे करण्यात येईल. जिल्हास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार देण्यात येणार असून यासाठी प्रथम पुरस्कार १५ हजार रुपये, द्वितीय १२ हजार रुपये व तृतीय १० हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह अशा स्वरुपात देण्यात येणार आहे. तर विभागस्तरावर राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार देण्यात येणार असून यामध्ये प्रथम ३० हजार रुपये, द्वितीय २० हजार रुपये व तृतीय १५ हजार रुपये राशी आणि राज्यस्तरीय महात्मा जोतिबा फुले जलमित्र पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम ५० हजार रुपये, द्वितीय ३५ हजार रुपये व तृतीय २५ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियामधील मराठी वृत्तकथा प्रसारित करणाऱ्यांना राज्यस्तरावर प्रथम १ लाख रुपये, द्वितीय ७१ हजार रुपये व तृतीय ५१ हजार रुपयाचा पुरस्का‍र प्रदान करण्यात येणार आहे. .