गडचिराेलीच्या रुग्णालयात ५९ अर्भक, बालकांचा मृत्यू

0
8

गडचिरोली(अशोक दुर्गम)दि.७ :– राज्य सरकारने गडचिरोलीत नव्यानेच सुरू केलेल्या महिला व बाल रुग्णालयात मागील चार महिन्यात शून्य ते ५ वयोगटातील तब्बल ५९ नवजात अर्भक तसेच बालकांचा अाणि एका मातेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी या रुग्णालयात जाऊन माहिती घेतल्यावर उघडकीस आली. वैद्यकीय अधिकारी डॉ.जयंत पर्वते यांनी स्वत: ही माहिती दिली. या रुग्णालयात डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची ९७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ५४ पदे अद्यापही रिक्त असल्याचा धक्कादायक प्रकारही आढळून आला.

रुग्णांच्या तपासण्यांसाठी एमआरआय, सिटी स्कॅन यंत्रे अद्याप उपलब्ध करण्यात आलेली नाहीत, अशी माहिती मिळाली. या रुग्णालयाची शंभर खाटांची क्षमता आहे. मात्र, सध्याच्या घडीला त्यात अडीचशे महिलांना भरती करण्यात आले आहे. एका खाटेवर दोन महिलांचा समावेश असल्याचे भेटीदरम्यान वडेट्टीवार यांना दिसून आले. रुग्णालयातील बालरोग विभागाची परिस्थितीही गंभीर असून बालरुग्णांसाठी २४ खाटांचीच व्यवस्था असताना सध्या ४५ बालके भरती असल्याचे आढळून आले. रुग्णालय व परिसरात अस्वच्छतेचे वातावरण आहे. सफाई कर्मचाऱ्यांचे पगारही अनेक महिन्यांपासून थकलेले अाहेत. औषधांचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत अाहे. वडेट्टीवारांनी रुग्णांना दिले जाणारे जेवण, प्रसूती वॉर्ड, औषध कक्ष, बालरोग चिकित्सागृहाचीही पाहणी केली.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाची कॉमन रिव्हीव्यू मिशन कमिटी जिल्ह्याच्या दौऱ्यावर कालपासून दौऱ्यावर आली आहे. अनेक उच्चपदस्थ अधिकारी या समितीत असून, ते जिल्ह्यातील विविध सरकारी रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांची तपासणी करणार आहेत. ही समिती जिल्ह्यात असताना आज ४ महिन्यांत तब्बल ५९ बालकांना जीव गमवावा लागल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ‘सीआरएम’ बालमृत्यूच्या गंभीर बाबीकडे किती गांभीर्याने बघते, हे आता बघायचे आहे.