रविवारपासून दुर्गम भागात रंगणार कबड्डी स्पर्धा

0
10

गडचिरोली ,दि.0८ः- जिल्हा हा अतिदुर्गम, आदिवासी बहुल जिल्हा असून आदिवासींची स्वतंत्री अशी संस्कृती येथे नांदत आहे. त्या संस्कृतीला उभारी देण्यासाठी व आदिवासींच्या अंगीकृत असलेल्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून दुर्गम भागात ९ ते ११ सप्टेंबर या कालावधीत भव्य कबड्डी स्पध्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
कबड्डी हा जिल्ह्यातील जनतेचा आवडता खेळ असून दुर्गम भागातील जनता ही सणासुदीच्या काळामध्ये गाव पातळीवर कबड्डी स्पर्धा आयोजित करून करमणूक करीत आहेत. परंतु त्यांचे सुप्तावस्थेतील कौशल्य जनसामन्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कोणतेही माध्यम नाही, ही बाब ओळखून पोलिस दलाच्यावतीने जनजागरण मेळावे व इतर कार्यक्रमादरम्यान विविध स्पध्रेचे आयोजन केले जाते. मागील वर्षीपासून पोलिस ठाणे, उपपोलिस ठाणे, पोलिस मदत केंद्र, पोलिस उपविभाग व जिल्हास्तरावर नृत्यू स्पर्धा, व्हॉलीबॉल स्पर्धा आदीचे आयोजन करून अतिदुर्गम भागातील हौशी खेळाडुंना संधी उपलब्ध करून देण्यात येत होती. यावर्षी कबड्डी स्पध्रेचे आयोजन करण्यात येत आहे. सदर स्पर्धा पोलिस ठाणे, उपपोलिस ठाणे, पोलिस मदत केंद्र स्तरावर घेण्यात येत आहे. यास्पध्रेतील विजेत्या तीन संघांना प्रथम बक्षीस ३ हजार, द्वितीय २ हजार, तृतीय बक्षीस १ हजार रुपय देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. तसेच पोलिस ठाणे स्तरावरील विजेत्या संघांना उपविभाग स्तरावर व उपविभाग स्तरावरील विजेत्यांना जिल्हा स्तरावर खेळण्याची संधी मिळणार आहे. या स्पध्रेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन गडचिरोली पोलिस दलाच्यावतीने करण्यात आले आहे.