चित्रनगरीसाठी प्रयत्न व्हायला हवे : ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त

0
18

नागपूर,दि.10ः विदर्भ हा कलावंतांचा खजिना आहे. विदर्भाने चित्रपटसृष्टीत नामांकित कलावंत दिले आहेत. असे असतानाही अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची विदर्भातील शाखा सुरू व्हायला तब्बल ५० वर्षांचा कालखंड लोटला. महत्प्रयासाने विदर्भाचे कार्यालय सुरू झाल्यामुळे आता वैदर्भीय कलावंतांचा पुढचा प्रयत्न चित्रनगरीसाठी असायला हवा, अशी भावना ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या विदर्भ शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. विदर्भ शाखेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम शनिवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडला. कार्यक्रमाला सिने अभिनेत्री व महामंडळाच्या संचालिका वर्षा उसगावकर, महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्यासह महापौर नंदा जिचकार, कांचन गडकरी, अभिनेते भारत गणेशपुरे, वैभव तत्त्ववादी, कवी रामदास फुटाणे, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, आ. अनिल सोले, उपमहापौर दीपराज पार्डीकर, क्रीडा सभापती नागेश सहारे, लघु उद्योग महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, ज्येष्ठ कलावंत जयंत सावरकर, राज कुबेर, प्रेमा किरण, समृद्धी पोरे, चैत्राली डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले म्हणाले की, विदर्भातील मोठी मंडळी सिनेसृष्टीत काम करीत आहे. विदर्भात नवोदित कलावंतही मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यांच्यासाठी महामंडळाचे विदर्भातील कार्यालय महत्त्वाचे ठरणार आहे. महामंडळाचे विदर्भात चित्रनगरी साकार करण्याचे स्वप्न आहे. विदर्भातील कार्यालयाकडून नक्कीच त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. विदर्भात गुणी कलावंत मोठ्या संख्येने आहेत. येथील भौगोलिक क्षेत्रसुद्धा सिनेमासाठी  उपयुक्त आहे. त्यामुळे निर्माता आणि दिग्दर्शकांनी विदर्भात चित्रपटाची निर्मिती करून स्थानिक कलावंतांना संधी द्यावी, असे आवाहन वर्षा उसगावकर यांनी केले. विदर्भात चित्रपटाचे शुटींग झाले पाहिजे, चित्रपट निर्मितीसाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याची गरज असल्याचे मत भारत गणेशपुरे यांनी व्यक्त केली. गिरीश गांधी यांनी सांस्कृतिक धोरण समितीने चित्रनगरीचा प्रस्ताव शासनाला दिला होता, शासनानेही तो मान्य केला असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन रवींद्र दुरुगकर व रूपाली कोंडेवार – मोरे यांनी केले.