पेसाविरहित गावात ओबीसींना १९ टक्के आरक्षण-खा.नेते

0
7

गडचिरोली,दि.१० – जिल्ह्यातील ओबीसी बांधवांचे १९ टक्के आरक्षण मागील सरकारने ६ टक्क्यांवर आणले. मात्र भारतीय जनता पार्टीच्या सरकारने ओबीसींचे आरक्षण पेसाविरहित गावात पूर्ववत १९ टक्के केल्याची माहिती आज १० सप्टेंबर रोजी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत खासदार अशोक नेते यांनी दिली.पत्रकार परिषदेला ओबीसी नेते बाबुराव कोहळे, डॉ. भारत खटी, प्रशांत वाघरे, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, अनिल कुनघाडकर, भास्कर बुरे, मुक्तेश्वर काटवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत पुढे माहिती देताना खा. नेते म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने २७ आॅगस्ट २०१८ ला एक परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार ज्या गावात ओबीसींची संख्या ५१ टक्क्यापेक्षा जास्त आहे, अशा सर्व गावांना पूर्ववत १९ टक्के आरक्षण जिल्ह्यात लागू झालेले आहे. मात्र शासनाच्या चुकीच्या माहितीच्या अहवालामुळे जिल्ह्यातील अनेक गावे पेसा कायद्यांतर्गत येतात. या सर्व गावांचे पुन्हा सर्वेक्षण करण्याकरीता शासनाने एक समिती स्थापन केलेली आहे. ही समिती काही दिवसानंतर जिल्ह्यात येवून सर्व्हेक्षण करून माहितीचा अहवाल शासनापुढे ठेवून जिल्ह्यातील वस्तुस्थिती पुढे ठेवणार आहेत.
मागील सरकारमुळे आदिवासी व ओबीसी वर्गात मोठी दरी निर्माण करण्याचे काम केलेले आहे. मात्र भाजपा सरकारने या दरी कमी करण्याचे काम केले असून जिल्ह्यात ओबीसी व आदिवासींवर होणारे अन्याय दूर करण्याकरीता या समितीचे गठण करण्यात आलेले आहे, अशीही माहिती यावेळी खा. नेते यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी कुणाच्या भूलथापांना बळी न पडता भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवण्याची गरज आहे, असेही आवाहन खा. नेते यांनी पत्रकार परिषदेतून केले.