आयआयएम जुलैपासून सुरू होणार

0
8

नागपूर – शहरात होणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची (आयआयएम) पाहणी करण्यासाठी बुधवारी अहमदाबाद येथील आयआयएमचे मुख्य प्रशासकीय अधिकारी मनोज भट यांच्या नेतृत्वात एक चमू नागपुरात आली. या चमूने नागपूर आयआयएमसाठी प्रशासकीय आणि शैक्षणिक अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. जुलै महिन्यापासून आयआयएमच्या अभ्यासक्रमास सुरुवात होणार आहे.

मिहानमध्ये यासाठी दोनशे एकर जागाही निश्‍चित करण्यात आली. आयआयएमची इमारत आणि आवश्‍यक सोयी-सुविधा निर्माण होईपर्यंत विश्‍वेश्‍वरैया राष्ट्रीय अभियांत्रिकी महाविद्यालयाद्वारे (व्हीएनआयटी) एक प्रस्ताव देण्यात आला आहे. केंद्राच्या मानव संसाधन विभागाच्या पथकाने चमूने मिहान आणि व्हीएनआयटी या दोन्ही जागेची पाहणी केली. त्यातूनच केंद्र सरकारद्वारे नागपूरमध्ये आयआयएमची सुरुवात आणि विकास करण्यासाठी त्याचे पालकत्व आयआयएम अहमदाबादकडे देण्यात आले. आता व्हीएनआयटीमध्ये आयआयएमसाठी शैक्षणिक आणि प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवड करण्याच्या दृष्टीने चमूने बुधवारी व्हीएनआयटीला भेट दिली. यात आयआयएम अहमदाबादचे प्रोफेसर पांडे, प्रोफेसर सोमन, सिव्हिल इंजिनिअर वाड्रा, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता नरेंद्र कुमार यांचा समावेश होता. शिवाय उच्च व तंत्रशिक्षण सहसंचालक गुलाबराव ठाकरे, व्हीएनआयटीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष विश्राम जामदार, संचालक डॉ. चौधरी आणि कुलसचिव डॉ. राजेंद्र येरपुडे उपस्थित होते. याबाबत माहिती देताना विश्राम जामदार यांनी चमूने इमारतीची पाहणी करून लवकरच अधिकारी नेमणार असल्याची माहिती दिली.