पोलिसांनी घेतला कारवाईचा धसका

0
15

गोरेगाव,दि.12ः- शहरातील अवैध व्यावसायिकांना अभय दिल्याचा ठपका ठेवत शहर पोलिस ठाणे व रामनगर पोलिस ठाण्यातील आठ पोलिस कर्मचार्‍यांवर पोलिस अधीक्षकांनी गुरुवारी, ६ सप्टेंबर रोजी निलंबनाची कारवाई केली होती. या कारवाईमुळे जिल्ह्यातील पोलिस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. कारवाईचा धसका घेत जिल्ह्यातील इतरही पोलिस कर्मचार्‍यांनी आपापल्या क्षेत्रात कारवाईचा सपाटा लावल्याचे चित्र असून गोरेगाव पोलिसांनी तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दारुविक्रेत्यांच्या विरोधात धाडसत्रच सुरू केले आहे. याअंतर्गत ११ अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईदेखील करण्यात आली आहे.
गोंदिया शहरात जुगार अड्डे, दारु, सट्टापट्टी व इतर अवैध धंदे सुरु असताना शहरातील पोलिस शिपाई अवैध व्यावसायिकांना अभय देत असून कारवाई करण्याकरीता टाळटाळ करीत असल्याच्या तक्रारी होत्या. याप्रकरणी पोलिस अधीक्षक हरिष बैजल यांनी चौकशी करून गुरुवारी रामनगर व गोंदिया या दोन्ही पोलिस ठाण्यातील प्रत्येकी चार प्रमाणे आठ पोलिस शिपायांना निलंबित केले होते.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील पोलिस कर्मचार्‍यांना जाग आल्याचे चित्र असून यात गोरेगाव पोलिसांनी अवैध व्यवसायिकांच्या विरोधात धाडसत्राला सुरुवात केल्याचे दिसते. विशेष म्हणजे अवैध दारूविक्रेत्यांच्या विरोधात गोरेगाव पोलिसांनी ठाणेदार जितेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनात रविवार, ९ सप्टेंबर रोजी धाडसत्र राबविले. या धाडीत पोलिसांनी ११ अवैध दारू विक्रेत्यांना अटक केली. तर त्यांच्याकडून ४0 हजार रुपये किंमतीची दारुही जप्त केली आहे.
अवैध दारु विक्रीप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथील परमेश्‍वर राजगिरे, बागडबंध येथील मंसाराम मेर्शाम, वामन परतेती, भडंगा येथील हेमंत मस्करे, गोरेगाव येथील प्रशांत वाघमारे, सोनी येथील व्यंकट कोहळे, गोरीटोला येथील अशोक बिजेवार, चिमणटोला येथील चैतराम गावड, शहारवाणी येथील तिलक मौजे, राजेश मौजे तर मुरदोली येथील चंद्रशेखर भुरेवार अशा ११ अवैध दारु विक्रेत्यांकडे धाड मारुन त्यांना अटक केली. या अवैध दारु विक्रेत्यांवर दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या धाडसत्रामुळे अवैध दारू माफियांचे धाबे दणाणले आहे.