नोकरानेच पळवले १८ लाख रुपयांचे टायर,चोरट्यांना जळगावात अटक

0
19
शहरात अरुण गुप्ता यांचे साईनाथ नगर येथे टायर विक्रीचे दुकान आहे. त्यांनी टायर ठेवण्यासाठी सहकारनगरमध्ये गोडावून भाड्याने घेतले आहे. याच गोडावूनमधून रात्री ४२९ लहान मोठ्या वाहनांचे, नवीन टायर चोरीला गेले. या प्रकरणी गोडावून मालक अरुण यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
शहरात राष्ट्रीय महामार्गावरील साईनाथ नगरात केतन टायर नावाचे टायरचे दुकान आहे. या टायरसाठी जिंदल कॉम्प्लेक्सच्या मागील भागात एक गोदाम आहे. या गोदामात शुभम अशोक तायडे हा नोकर म्हणून कामाला होता. दुकानाचे मालक अरूण गंगासागर गुप्ता रा. साकोली हे तिरुपती येथे देवदर्शनासाठी गेले असता १0 सप्टेंबर रोजी रात्री १0 वाजताच्या सुमारास शुभम तायडे याने संभाजी पंडीत पाटील याच्या मदतीने गोदामातील सर्व टायर एका ट्रकमध्ये (क्र .एम. एच. १८ एम ८00९) टाकले. व दोघेही जळगावच्या दिशेने निघाले. ११ सप्टेंबर रोजी गोदामात चोरी झाल्याची माहिती दुसर्‍या नोकराने दुकान मालक गुप्ता यांना दिली. गुप्ता यांनी त्वरित भंडारा पोलिसात तक्र ार केली. तक्र ार प्राप्त होताच पोलिसांनी तपास सुरू केला. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय जोगदंड, पोलिस निरीक्षक सुधाकर चव्हाण यांनी गोदामातील सीसीटीव्हीची तपासणी केली असता त्यामध्ये शुभम तायडे याने चोरी करण्यापूर्वी सीसीटीव्हीचे कॅमेरे बंद केल्याचे दिसून आले. त्याचा मोबाईलही बंद असल्याने त्याच्यावर संशय बळावला. तेव्हा पोलिसांनी शुभम तायडे याच्या जवाहरनगर येथील घरी जाऊन चौकशी केली असता, तो जळगाव येथे गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे भंडारा पोलिसांनी बुलढाणा, धुळे व जळगाव जिल्हा पोलिसांना चोरट्यांचे वर्णन सांगून गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पथक जळगावकडे रवाना केले. शुभम तायडे याचा मामा व दुकान मालक गुप्ता यांना पोलिसांनी सोबत घेतले होते.
भंडारा, धुळे, बुलढाणा व जळगाव या चारही जिल्हा पोलिसांच्या योग्य समन्वयामुळे अवघ्या २४ तासाच्या आत दोन्ही चोरट्यांना १३ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजताच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील बसस्थानकातून ताब्यात घेण्यात आले. जप्त केलेल्या टायरची किंमत १७ लाख १३ हजार ६१९ व ७ लाख रुपयांचा ट्रक असा २४ लाख १३ हजार ६१९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्वत:चा टायरचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण चोरी केल्याची कबुली आरोपी शुभम तायडे याने पोलिसांना दिली.
याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींवर भादंविच्या कलम ३८१, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला असून तपास पोलिस उपनिरीक्षक अमरदिप खाडे करीत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक विनीता साहू, अप्पर पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय जोगदंड, पोलिस निरीक्षक सुधाकर जाधव यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अमरदिप खाडे, पोलिस हवालदार शेंडे, भुसावळे, प्रशांत गुरव, वाघमारे, मेर्शाम, कुकडे, बन्सोड, क्रि ष्णा यांनी केली.