अ.भा. किसान कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी नाना पटोले

0
7

गोंदिया,दि.14 : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना पटोले यांची कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी किसान, खेत, मजदूर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्याची घोषणा आज(दि.14) अशोक गहलोत यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या नियुक्तीने विदर्भातील राजकारणात बदल होण्याची आता शक्‍यता वाढली आहे. भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार प्रा.महादेवर शिवणकर हे भाजप किसान आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिल्यानंतर पटोले हे राजकीय पक्षाच्या किसान आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष होणारे दुसरे नेते विदर्भातील ठरले आहेत.दरम्यान त्यांच्या नियुक्तीची माहिती होताच भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात पटोले हे बुथ कमिटीच्या बैठकीला हजर असतांना काँग्रेसच्या कार्यकर््त्यांनी त्यांचे स्वागत केले.

गेल्या डिसेंबर महिन्यात भाजपचा राजीनामा देऊन कॉंग्रेसमध्ये आलेल्या नाना पटोले यांना कॉंग्रेसने अखिल भारतीय स्तरावरील पद दिले आहे. शेतकऱ्यांच्या मुद्यावरून नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करून भाजपला रामराम ठोकला होता. यानंतर त्यांची कॉंग्रेसने महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यात पटोले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याचे फळ म्हणून पटोले यांना राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी सोपविल्याचे बोलले जात आहे. पटोले हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जात असून विदर्भातील नेत्यांना वरिष्ठ पद दिल्याने विदर्भातील कॉंग्रेस संघटना बळकट होण्यास मदत होणार आहे.