ओबीसींवर अन्याय करणाऱ्या शासनाच्या परिपत्रकाची शिवसेनेने केली होळी

0
12

कुरखेडा, दि.१४: अनुसूचित क्षेत्रातील सरळसेवेने भरावयाची वर्ग ३ व ४ ची १७ पदे अनुसूचित जमातीमधूनच भरण्यात यावीत, असे परिपत्रक राज्य शासनाने काढल्यानंतर ओबीसी समाजात तीव्र असंतोष पसरला असून, आज शिवसैनिकांनी कुरखेडा येथे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात या परिपत्रकाची होळी केली.जीआरची होळी करतेवेळी शिवसेना तालुकाप्रमुख आशिष काळे, उपतालुकाप्रमुख विजय पुस्तोडे, युवासेना तालुकाप्रमुख मोंटू चव्हाण, माजी जिल्हा परिषद सभापती निरांजनी चंदेल, महिला आघाडी तालुकाप्रमुख शारदा गाथाडे, कांता बावनकर, सईबाई लाडे, डॉ.अनिल उईके, हेमंत पाथरे, भास्कर गुंडरे, निखिल वडीकर, तुळशीराम बुरबांधे, तेजराम राऊत, कुणाल शास्त्रकार, विनोद बुरबांधे, रोहित निपाने, हेमंत चंदनखेडे, राजू नंदनवार, राकेश चव्हाण उपस्थित होते.

९ जून २०१४ च्या राज्यपालांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील वर्ग ३ व ४ ची १२ पदे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधूनच भरावयाची आहेत. या अधिसूचनेनंतर मागील चार वर्षांपासून गैरआदिवासी व विशेषत: ओबीसी प्रवर्गात तीव्र असंतोष पसरला आहे. त्यातच राज्य शासनाने ११ सप्टेंबर २०१८ रोजी एक परिपत्रक काढून १२ पदांमध्ये आणखी पाच पदांची भर घातली आहे. हे परिपत्रक ओबीसींवर अन्यायकारक आहे. निवडणुकीपूर्वी भाजपच्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी आरक्षण पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु चार वर्षे लोटूनही आरक्षण तर पूर्ववत झाले नाहीच;उलट टप्प्याटप्प्याने ओबीसींवर अन्याय करणारे जीआर काढले जात आहेत. असे असताना जिल्ह्यातील भाजपचे वरिष्ठ ओबीसी नेते गप्प का, असा सवाल शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी केला आहे.

जिल्ह्यातील ओबीसी बांधव पूर्वीपासूनच सर्व जाती-जमातीच्या लोकांशी मिळूनमिसळून राहत आहेत. परंतु शासनाच्या निर्णयामुळे ओबीसीमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यांनी कुठे नोकऱ्या शोधायच्या, असा प्रश्न उपस्थित करुन सुरेंद्रसिंह चंदेल यांनी ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा दिला आहे. ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करणे जमत नसेल, तर जिल्ह्यातील आमदार,खासदार व मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही शिवसेनेने केली आहे.