पाचपावलीत क्षुल्लक कारणावरून तरुणाची हत्या

0
10

नागपूर दि.१४:: बंद पडलेल्या मोटरसायकलला सुरू करताना जोरात एक्सिलेटर दाबल्याच्या क्षुल्लक कारणावरून चार आरोपींनी मोटरसायकलस्वाराला भोसकून ठार मारले. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बारसेनगरात गुरुवारी रात्री ११.५५ वाजताच्या सुमारास ही थरारक घटना घडली.
सुमीत रामदास ढेरिया असे मृत मोटरसायकलस्वाराचे नाव आहे. तो टिमकीतील संभाजी रोड परिसरात राहत होता. नितीन पांडुरंग शेटे (वय २२) आणि सुमीत हे दोघे मोटरसायकलने गुरुवारी रात्री बारसेनगरातून जात होते. अचानक त्यांची मोटरसायकल बंद पडली. ती सुरूच होत नव्हती. त्यामुळे नितीनने खाली उतरून मोटरसायकलला धक्का दिला तर सुमीतने जोरात एक्सिलेटर दाबले. मोटरसायकल सुरू झाली. ती पुन्हा बंद पडू नये म्हणून सुमीतने रेज केली. त्यामुळे आवाज झाला. यावेळी बाजूला चार समाजकंटक होते. त्यांनी सुमीतला शिवीगाळ केली. त्यातून आरोपींसोबत सुमीतचा वाद झाला. आकस्मिक वादात आरोपींनी चाकू काढून सुमीतला भोसकले. तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर आरोपी पळून गेले. नितीनने मदतीसाठी आरडाओरड केली. त्यानंतर मोठ्या संख्येत बाजूची मंडळी धावली. जखमी सुमीतला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी सुमीतला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. माहिती कळताच पाचपावली पोलीस पोहचले. त्यांनी नितीनच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. आरोपींची चौकशी केली जात आहे.