देशभरातील शेतकर्‍यांचे संगठन उभारू- नाना पटोले

0
7

भंडारा,दि.15ः-आजवर सरकारने केवळ शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. शेतकरी व शेतमजुरांचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाने आवडीच्या क्षेत्राची जबाबदारी दिली आहे. यापुढे देशभरातील शेतकर्‍यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात त्यांना एकत्र आणून संगणन उभारून न्याय देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही काँग्रेस किसान आघाडीचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनीशुक्र वारी भंडारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय किसान आघाडीच्या अध्यक्षपदावर नाना पटोले यांची निवड केल्यानंतर ते पहिल्यांदाच पत्रकारांशी बोलत होते.
केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात पटोले म्हणाले की, सरकारने शेतकर्‍यांना पिक विमा सक्तीचा केला. ज्या शेतकर्‍यांची इच्छा नाही अशांना विम्याची रक्कम भरण्यास सांगितली. परंतु, नुकसानभरपाई देताना मात्र सरकार व विमा कंपन्यांनी आपले हात वर केले. त्यामुळे शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहीले. ही स्थिती संपूर्ण देशातील आहे. कर्जमाफी योजना राबवितानाही सरकारकडून शेतकर्‍यांवर अन्याय करण्यात आला आहे.
आता पक्षाने आपल्यावर राष्ट्रीयस्तरावरील जबाबदारी दिली असून ती आपण आनंदाने स्विकारली आहे. यापुढे देशभरात दौरे करून सर्व शेतकर्‍यांना सरकारच्या चुकीच्या निर्णयाची माहिती दिली जाणार आहे. शेतकर्‍यांचे मोठे संगठन उभारून सरकारविरोधात आंदोलन उभे केले जाईल, असे त्यांनी सांगितले.