सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी नागपूरमध्ये १८ सप्टेंबरला पेन्शन अदालत

0
10

वाशिम, दि. १५ : केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतन धारक कल्याण विभागाचे आदेशानुसार संपूर्ण देशामधील संबंधित राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये १८ सप्टेंबर २०१८ रोजी ‘पेंशन अदालत’ आयोजित करण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या नागपूर लेखा व कोषागारे तसेच नागपूर महालेखागार यांच्या संयुक्त विद्यमाने निवृतीवेतन मंजूर न झालेल्या सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांची निवृत्तीवेतन प्रकरणे निकाली काढण्यासाठी दि. १८ सप्टेंबर २०१८ रोजी नागपूर येथील साई सभागृह, शंकरनगर, अंबाझरी रोड येथे पेंशन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या कालावधीत नागपूर व अमरावती विभागातील पेंशन प्रकरणांवर तर दुसऱ्या सत्रात म्हणजेच दुपारी १ ते ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत औरंगाबाद विभाग पेंशन प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. या अदालतीकरीता नागपूर महालेखापाल यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. ते प्रलंबित निवृत्तीवेतन प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रकरणांची तपासणी करून जागेवरच निकाली काढणार आहेत. तरी सर्व कार्यालय प्रमुख, आहारण व संवितरण अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील प्रलंबित पेंशन प्रकरणांचे दस्ताऐवज घेऊन उपस्थित रहावे. प्रलंबित प्रकरणांची यादी सर्वच कार्यालय प्रमुख, आहरण व संवितरण अधिकारी यांनी पाठविण्यात आली आहे. तरी त्यांनी या पेंशन अदालतीला उपस्थित राहून प्रलंबित पेंशन प्रकरणे निकाली काढावीत, असे जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत खारोडे यांनी कळविले आहे.