नक्षल्यांकडून दोघांची निर्घृण हत्या…

0
18

गडचिरोली(अशोक दुर्गम),दि.15: सशस्त्र नक्षल्यांनी आज मध्यरात्री छत्तीसगडमधील दोन इसमांची धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या केली. ही घटना एटापल्ली तालुक्यातील गट्टा(जांभिया)उपपोलिस ठाण्यापासून १ किलोमीटर अंतरावरील ताडगुडामार्गावर घडली. सोनू पदा(३५)व सोमजी पदा(४०)दोघेही रा.उलिया,(बांदे, छत्तीसगड)अशी मृतांची नावे आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ते २५ सशस्त्र नक्षलवादी काल सोनू पदा व सोमजी पदा यांच्या गावी गेले. त्यांना झोपेतून उठवून बाहेर नेले व नंतर त्यांची शस्त्राने गळा कापून हत्या केली. नक्षल्यांनी दोघांचेही मृतदेह गट्टा उपपोलिस ठाण्यापासून उत्तरेस १ किलोमीटर अंतरावर असलेल्या ताडगुडा मार्गावर फेकून ठेवले. आज सकाळी दोघेही मृतावस्थेत आढळून आले. पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन त्यांची हत्या करण्यात आली असावी, असा कयास करण्यात येत आहे.