जिल्ह्यात ‘नक्षल पीडित पुनर्वसन समिती’ स्थापन

0
14

गडचिरोली,दि.16ः- नक्षल पीडित संघटीत नसल्याने ते न्यायापासून दूर आहेत व त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आले आहे. असंघटीत असलेल्या नक्षल्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांचे प्रतिनिधीत्व करणारी गडचिरोली पहिली ‘नक्षल पीडित पूनर्वसन समिती’ स्थापन करण्यात आल्याची माहिती भारतीय मानवाधिकारी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश मोकासे यांनी आज पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला नंदकुमार चौगुले, पुरुषोत्तम ठाकरे, गजेंद्र डोमळे व नक्षल पीडित उपस्थित होते. पत्रकार परिषदेत माहिती देताना मोकासे सांगितले की, गडचिरोलीतील नक्षल पीडितांनी भारतीय मानवाधिकार परिषदेस स्वतंत्र लेखी पत्राद्वारे समस्या कळवून नक्षल पीडितांचे प्रतिनिधीत्व करण्याविषयी विनंती केली होती. या बाबीचा गांर्भीय समजून भारतीय मानवाधिकार परिषदेने नक्षल पीडितांना त्यांची बाजू मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारतीय मानवाधिकार परिषद आणि नक्षल पीडितांची एक संयुक्त पूनर्वसन समिती स्थापन केली आहे. ही समिती सद्या एका वर्षाकरिता काम करणार असून या समितीत एकूण ५ नक्षल पीडित प्रतिनिधी आहेत. आतापर्यंत ५१ नक्षल पीडितांनी या समितीत आपल्याची नावाची नोंदणी केल्याची माहिती अविनाश मोकासे यांनी सांगितले.
नक्षल पीडितांची ओळख व शोध घेऊन त्यांना संघटीत करणे, विविध शासकीय, निमशासकीय यंत्रणामार्फत राबविण्यात येणार्‍या प्रकल्प व योजनामध्ये नक्षल पीडितांना शासकीय सेवेत समाविष्ठ करून आर्थिक मदत उपलब्ध करून देणे, विस्थापित नक्षल पीडितांना त्यांच्या राहत्या गावात प्रस्थापिक करणे आदी उद्दिष्ट समितीचे असल्याचे मोकासे यांनी सांगितले.