‘आमची शाळा, आदर्श शाळा’ स्पर्धा जिल्ह्यात राबविणार : डॉ. दयानिधी

0
48

तिरोडा,दि.16 : अदानी फाउंडेशन तिरोडामार्फत तिरोडा तालुक्यात राबविण्यात येत असलेली आमची शाळा आदर्श शाळा स्पर्धा शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रेरणादायी असून यामुळे नक्कीच शैक्षणिक गुणवत्ता वाढेल. त्यामुळे ही स्पर्धा जिल्हास्तरावर राबविण्याचा मानस जि.प. गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी व्यक्त केला.आमची शाळा आदर्श शाळा स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन अदानी पॉवर तिरोडा येथे करण्यात आले होते. याप्रसंगी प्रामुख्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे, पी.पी. समरीत, एम.डी. पारधी, सि.पी. साहू, समीर मिश्रा, नितीन शिराळकर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने करून अदानी फाउंडेशनचे नितीन शिराळकर यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाविषयी माहिती सांगितली. अदानी पॉवर प्रमुख सि.पी. साहू यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी अदानी फाउंडेशनद्वारे विविध उपक्रम राबविले जातात, असे सांगून विजेता शाळांचे अभिनंदन केले. आमची शाळा आदर्श शाळा स्पर्धेमध्ये विजेता शाळा प्रथम क्रमांक जि.प. उच्च प्राथमिक शाळा कोडेलोहारा, द्वितीय क्रमांक जि.प. उच्च प्राथमिक शाळा गोंडमोहाडी व तृतीय क्रमांक जि.प. उच्च प्राथमिक शाळा चांदोरी खुर्द यांना अनुक्रमे एक लाख, पंच्याहत्तर हजार व पन्नास हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्याच्या स्वरुपात पारितोषिक, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. .