घरात घुसलेला बिबट १४ तासानंतर जेरबंद

0
13

अर्जुनी मोरगाव,दि.16(संतोष रोकडे) : शिकारीचा पाङ्गलाग करत घरात शिरलेल्या बिबटाला पिंजर्यात कैद करण्याकरिता वनविभागाला तब्बल १४ तास सर्कस करावी लागली. ही घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडीदेवी गावात घडली. राज्याच्या पूर्व टोकावर असलेला गोंदिया जिल्हा वनराईने नटलेला आहे. अर्जुनी मोरगाव या तालुक्याला वनवैभव प्राप्त आहे. येथे नेहमी वन्यप्राण्यांचा वावर असतो. या तालुक्यातील येरंडीदेवी या गावात शनिवारी(दि. १५) रात्री सव्वा दहाच्या सुमारास मांजराचा पाङ्गलाग करत बिबट थेट गावात शिरला. ज्या मांजराचा पाठलाग बिबट करत होता, ती मांजर गावातील शालिक सिताराम दोनोडे यांच्या घरात शिरले. यावेळी शालिक दोनोडे यांचा लहान भाऊ माणिक लघुशंकेकरिता घराच्या बाहेर असताना त्याने हा प्रकार आपल्या डोळ्यांनी बघितला. त्याने लगेच आरडाओरड केली. तोपर्यंत मांजर आणि बिबट दोघेही घरातील दुसNया माळ्यावर म्हणजे धाब्यावर गेले. लोक गोळा झाले. लोक गोळा झाल्याने बिबट दडून बसला. तात्काळ याची माहिती वनविभागाला देण्यात आली. घटनेचे गांभीर्य बघता २० ते २५ मिनीटात वनविभागाचा ताफा घटनास्थळावर दाखल झाला. बिबटाला बाहेर हाकलण्याचे आटोकाट प्रयत्न करण्यात आले. परंतू, प्रयत्नांना यश आले नाही. अनेकांनी युक्ती शोधली, ती पण कामी आली नाही. यादरम्यान वाघाला बघण्याकरिता चान्ना बाक्टी, सोमलपूर,गुढरी, सिलेझरी, विहीरगाव, बोंडगावदेवी, सानगडी येथील नागरिकांनी येरंडीदेवी येथे गर्दी केली. कसल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, याकरिता पोलिसांनी तगडा बंदोबस्त केला होता. संपूर्ण रात्र येरंडीदेवी येथील नागरिकांनी जागून काढली. अखेर आज रविवारी दुपारी १२.५ वाजताच्या सुमारास पशुवैद्यकीय अधिकारी खोडस्कर यांनी पाचारण करण्यात आले. त्यांनी बिबटाला गुंगीचे दोन इंजेक्शन दिले. ही प्रक्रीया १५ ते २० मनिट सुरू होती. यावेळी वनविभागाचे अधिकारी श्री रेड्डी, वनपरिक्षेत्राधिकारी श्री रहांगडाले, क्षेत्र सहायक श्री शेंडे, श्री गोटेफोडे, सोनवाने, बोहरे, वनरक्षक भोयर, नितीन चव्हाण, गोदे, परशुरामकर, शहारे, परसगावे, सौ. वानखेडे, सौ. वाढई, सौ. रहिले आदी वनकर्मचारी उपस्थित होते. बिबट जेरबंद झाल्यानंतर दोनोडे कुटुंबियांनी सुटकेचा श्वास सोडला. दरम्यान पोलिस पाटील हनवत बारसे, सरपंच लिलेश्वर खुणे, आसाराम मेंढे, दिलीप बहेकार, सतीश बहेकार, राजकुमार वाढई, किशोर बोरकर, रामेश्वर थेर, मारोती दोनोडे, मंगेश हेमने, जनार्दन दोनोडे, मारोती दोनोडे यांनी वनविभाग आणि पोलिस विभागाला सहकार्य केले.