सर्व विदर्भालाच द्यायचे काय? – विनोद तावडे

0
20

नागपूर – आघाडी सरकारच्या काळात विदर्भावर अन्याय केल्याचा सातत्याने आरोप करणारे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडेंची सत्तेवर येताच भाषा बदलली. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूरला केव्हा सुरू करणार, असा प्रश्‍न विचारला असता ते चांगलेच चिडले. एवढेच नव्हे, तर सर्व काही तुम्हालाच द्यायचे काय? असा उलट सवाल करून त्यांनी विदर्भविरोधी भूमिका स्पष्ट केली.

विकासाचा निधी पश्‍चिम महाराष्ट्राकडेच वळता केला जात असल्याने राष्ट्रपतींनी विदर्भ वैधानिक विकास मंडळाची स्थापना केली. केळकर समितीनेसुद्धा राज्याच्या समतोल विकासासाठी विदर्भाला मोठ्या प्रमाणात निधी देण्याची शिफारस केली आहे. हिवाळी अधिवेशनात आयआयएमची घोषणा राज्य शासनामार्फत करण्यात आली. ट्रिपल आयटीसुद्धा नागपुरात होणार आहे. ही बाब त्यांना फारशी रुचली नाही. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सर्वच विदर्भाला द्यायचे काय? असा सवाल करून जाहीरपणे विदर्भाविरोधी भूमिका घेतली.

आघाडी शासनाच्या कार्यकाळात नागपूरमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली होती. मंत्रिमंडळाने यास मंजुरीसुद्धा दिली आहे. विदर्भाचा विकास होऊ लागल्याने प्रामुख्याने पश्‍चिम महाराष्ट्राच्या नेत्यांना ही बाब चांगलीच खुपू लागली असल्याचे दिसून येते.