शेतकरी व सभासदांचे हित साधणे हाच उद्देश – सुनील फुंडे

0
16

भंडारा,दि.17ः- जिल्हा मध्यवर्ती बँकेचा उद्देश फक्त शेतकरी व सभासदांचे हित साधणे आहे. शेतकरीच बँकेचे खरे मालक आहेत. त्यामुळे त्यांना निधीची कमतरता भासणार नाही, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी केले. बँकेची आमसभा रविवारी (दि.१६) लक्ष्मी सभागृहात पार पडली. यावेळी ते बोलत होते.
सभेला आ. चरण वाघमारे, अर्बन बँकेचे अध्यक्षमहेश जैन, उपाध्यक्षसदाशिव वलथरे, संचालक कैलाश नशिने, रामलाल चौधरी, रामराव कारेमोरे, रामदयाल पारधी, होमराज कापगते, विलास वाघाये, सत्यवान हुकरे, प्रशांत पवार, डॉ. श्रीकांत वैरागडे, वासुदेव तिरमारे, अंजिरा चुटे, कवलजितसिंह चढ्ढा, नरेंद्र बुरडे, विनायक बुरडे, योगेश हेडावू, जि.प. अध्यक्षरमेश डोंगरे, सभापती धनेंद्र तुरकर, माजी आ. आनंदराव वंजारी, तुमसर कृउबास सभापती भाऊराव तुमसरे प्रामुख्याने उपस्थित होते.
सुनील फुंडे म्हणाले, सन २00५-0६ पासून बँक सतत नफ्यात आहे. चालू वर्षी बँकेला १0.२८ कोटी ढोबळ नफा झाला असून २.0४ लक्ष निव्वळ नफा झाला आहे. भंडारा, साकोली, पवनी, तुमसर येथे शेतकर्‍यांना मार्गदर्शनासाठी आर्थिक साक्षरता केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. कुठल्याही शाखेतून ग्राहक व्यवहार व एसएमएस अलर्ट, एटीएम, नेट बँकींग सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. बँकेचे ९ एटीएम सुरू असून महिन्याच्या अखेरीस ११ एटीएम सुरू होतील. शेतीक्षेत्र ओलितासाठी प्राधान्याने जलसिंचनासाठी मध्यम, दिर्घमुदती कर्जपुरवठा, नवीन गोदाम बांधणे, दुरूस्तीसाठी बचतगटांना कर्जपुरवठा सुरू आहे.
प्रधानमंत्री मुद्रा लोन, सोनेतारण, पगारतारण व पेंशनतारण कर्जाची सोय आहे. बँकेचे २00६ मध्ये विभाजन झाल्यानंतर एकूण भागभांडवल १0.४१ कोटी व ठेवी २६३.१७ कोटी होते. मात्र, आमसभेशी संबंधित वर्ष अखेर बँकेत एकूण ३६.७0 कोटी व एकूण ठेवी ९६८.५८ कोटी आहेत. पुढील वर्षी ११00 कोटी रुपयांच्या ठेवीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शासनाकडून २८0 कोटीचे उद्दिष्ट असून आतापर्यंत ५६ हजार सभासदांना २४३.७0 कोटीचे पीककर्ज बँकेने स्वनिधीतून वाटप केले आहे. कर्जमाफीच्या घोषणेमुळे सभासदात संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे चालू हंगामात बँकस्तरावर कर्जाची वसुली ५0 टक्के झाली आहे. पुढील वर्षी संस्थेनी चालू व थकीत कर्जाची १00 टक्के वसुली करावी, असे आवाहन त्यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शासनाकडे दुरूस्त केलेली सभासदांची माहिती पाठविली असून ग्रीन यादी १२000 ते १५000 सभासदांची २0 सप्टेंबरनंतर येणे अपक्षीत आहे. शेतकरी कर्जवाटपासून वंचित राहू नये म्हणून खरिप कर्जवाटपाची मुदत २९ सप्टेंबरपर्यंत वाढविल्याचे फुंडे यांनी सांगितले.