लोकराज्यचा ‘शैक्षणिक विशेषांकङ्क वाचनीय व माहितीपूर्ण- जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे

0
84

लोकराज्यच्या सामर्थ्य शिक्षणाचे, समृद्ध महाराष्ट्राचे अंकाचे प्रकाशन
गोंदिया , दि. १७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून प्रत्येक महिन्याला लोकराज्य विशेषांक काढण्यात येतो. सप्टेंबर महिन्यातील शैक्षणिक क्रांतीचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यावर लोकराज्य विशेषांक काढला आहे. हा विशेषांक अतिशय दर्जेदार, वाचनीय आणि माहितीपुर्ण असा अंक आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लोकराज्य वर्गणीदार व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लोकराज्यच्या सामर्थ्य शिक्षणाचे, समृद्ध महाराष्ट्राचे या सप्टेंबर महिन्याच्या विशेषांकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजा दयानिधी, निवासी उपजिल्हाधिकारी हरीष धार्मिक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते व जिल्हा आरोग्य अधिकारी श्याम निमगडे उपस्थित होते.
लोकराज्य मासिकाच्या सप्टेंबर महिन्याच्या अंकामध्ये विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या तरूणांच्या यशकथा, विविध क्षेत्रातील नव्या संधी, उद्योगनिर्मिती, कौशल्य विकास या विषयावरील विशेष लेखांचा समावेश आहे. कौशल्य विकास व माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर हे या अंकाचे अतिथी संपादक आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, यांच्यासह डॉ. गो. मा. पवार, डॉ. भालबा विभूते, विभागीय संपर्क अधिकारी तसेच विविध जिल्ह्यांतील जिल्हा माहिती अधिकारी यांनी आपल्या लेखणीचे योगदान लोकराज्य विशेषांकासाठी दिले आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेतना कोणतीही अडचण येऊ नये या हेतूने ही शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना शासन राबवत आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा आठ लाख रुपये केली आहे. यामुळे मोठ्या संख्येने या घटकांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्सय् व्यवसाय, दंत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह योजनेच्या माध्यमातून ग्रामीण आणि दुर्गम भागातील व व्यासायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता दिला जाणार आहे. या दोन्ही योजनांची माहिती या सप्टेंबरच्या लोकराज्यच्या अंकात विस्तृतपणे दिली आहे. हा अंक प्रत्येक विद्यार्थ्यासाठी व त्यांच्या पालकांसाठी खूप महत्वाचा आहे. या अंकाची किंमत फक्त १० रुपये असून प्रत्येकाने हा खरेदी करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी यावेळी केले.