स्क्रब टायफसचे संशयीत रुग्ण आढळून आल्यास नागरिकांनी घ्यावयाची काळजी

0
25

गोंदिया,दि.१७ : सध्या स्क्रब टायफस हा आजार विदर्भातील काही जिल्ह्यात आढळून येत आहे. गोंदिया जिल्ह्यात सुध्दा या आजाराची लागण काही तालुक्यात झालेली आहे. त्याकरीता वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने गावातील नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी केले आहे.
जिल्ह्यात सर्व वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना स्क्रब टायफस आजारावर वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याकरीता सूचना दिल्या आहे. त्यानुसार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना सतर्क करण्यात आले आहे.
स्क्रब टायफस आजाराचा प्रसारह्न स्क्रब टायफस हा एक जंतू संसर्ग आजार असून माईट किड्याचे पिल्लू असलेल्या चिग्गरमुळे होतो. स्क्रब टायफस ओरिएंटा टुसूग्रामुशी नामक बॅक्टेरियामुळे होणारा अतिशय गंभीर पण उपचाराने बरा होणारा आजार आहे. हा आजार अफगाणीस्तान, पाकिस्तान, रशिया, जपान, ब्रम्हदेश आणि भारतात आढळतो. भारतात हिमाचल प्रदेशमध्ये या आजाराचे रुग्ण प्रामुख्याने आढळून येतात. परंतू अलिकडच्या काळामध्ये उत्तरप्रदेश, महाराष्ट्र राज्यांमध्ये या आजाराचे तुरळक रुग्ण आढळून येत आहेत. माईट या किटकाचे जीवनचक्र हे अंडी, अळी (चिग्गर), निम्फ, माईट असे आहे. यातील चिग्गर या अळीने चावल्यानंतर ६ ते २१ दिवसांनी या आजाराची लक्षणे दिसून येतात. ही अळी गरम रक्ताच्या प्राण्यांच्या शरीरावरील त्वचेमध्ये राहणे पसंत करते. ही अळी चावल्यानंतर त्वचेला छोटासा अल्सर होतो. ही चिग्गर अळी ०.१७ ते ०.२२ एमएम इतक्या लांबीची असून अंडी घातल्यानंतर १० ते १२ दिवसांनी ती तयार होते. पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे चिग्गर मोठ्या गवतामध्ये, झाडा-झुडपामध्ये वास्तव्य करतात. तर उन्हाळ्यामध्ये मात्र सावलीत झाडांच्या पानांच्या खाली आढळून येतात तसेच चिग्गर हे प्राण्यांच्या अंगावरील विशेषत: कानामध्ये तसेच शेपटीच्या व गुदद्वाराच्या अवतीभोवती दिसून येतात. हे किटक जंगलामधील किंवा जेथे घनदाट झाडेझुडपे आहेत अशा ठिकाणी वास्तव्यास असतात. तसेच हे किटक उष्ण रक्त असलेले प्राणी यांच्या सिरमवर अवलंबून असतात. त्यामुळे हे किटक शेतामधील उंदीर, घुशी व इतर प्राणी यांच्या शरीरावर आढळून येतात.
संशयास्पद स्क्रब टायफस रुग्ण- तीव्र ताप असलेले रुग्ण, ज्यांच्या तापाचे निदान होत नाही आणि हया तापाचा कालावधी ५ दिवसांपेक्षा जास्त आहे आणि त्या रुग्णामध्ये रॅश आहे किंवा नाही अशा रुग्णांना संशयास्पद स्क्रब टायफस रुग्ण म्हणावा.
प्राथमिक लक्षणे- चिग्गर चावल्यामुळे चावलेल्या ठिकाणी खाज, पुरळ व अंगावर चट्टे, दंश केलेल्या ठिकाणी जखम होवून खिपली येते तसेच रुग्णात अंग दुखणे, ताप, डोकेदुखी, थंडी व वायरल इंफेक्शन सारखे लक्षणे असतात. सर्वात गंभीर बाब म्हणजे चिग्गर चावल्यामुळे गुप्तांगावर काळे डाग येतात ज्याकडे दुर्लक्ष होते. संभाव्य गुंतागूंत झाल्यास न्युमोनीया, मेंदूज्वरसदृश्य लक्षणे, मायोकार्डायटीस इत्यादी गंभीर रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण ३० टक्के पर्यंत आहे. या आजाराकरीता प्रतिबंधक लस नाही. लवकर निदान जनजागरण, उंदरावर नियंत्रण मिळवले तर स्क्रब टायफस आटोक्यात येवू शकतो.अतिजोखमीची व्यक्ती- शेतकरी, शेतात काम करणारे मजूर, जंगलामध्ये गाई चारण्यास नेणारी व्यक्ती इत्यादी लोकांनी या आजाराबाबत जास्त दक्षता घेणे गरजेचे आहे.
निदान- टायफस आजाराचे निदान करण्यासाठी पुढीलप्रमाणे चाचण्या केल्या जातात. वेलफेलिक्स टेस्ट ज्यामध्ये जदद ढळींीश हे वाढलेले आढळून येते. ही खात्रीशीर निदान चाचणी नसली तरी आपण या चाचणीच्या आधारावर स्क्रब टायफसचे उपचार चालू करु शकतो. ही चाचणी स्क्रिनिंग टेस्ट म्हणून उपयुक्त आहे. सिरॉलॉजिकल निदान ज्यामध्ये एलिझा व इतर पध्दतीचा उपयोग करुन शरीरातील स्क्रब टायफसच्या ॲन्टीबॉडीज पाहिल्या जातात. ही चाचणी खात्रीशीर निदान म्हणून उपयोगिली जाते.
उपचार- स्क्रब टायफस आणि एकूणच रिकेटशियल तापामध्ये टेट्रासायक्लीन, क्लोरॅमफेनिकॉल आणि डॉक्सीसायक्लिन ही औषधे परिणामकारक ठरतात. या आजाराचा उपचार जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजना- घराभोवती असलेल्या शेणाची उकंडे/कचऱ्याचे ढिगारे त्वरित नष्ट करावे. माईट नियंत्रणाकरीता किटकनाशकाचा वापर करावा. झाडाझुडपात काम करतांना पूर्ण बाहयांचे पायघोळ कपडे वापरावे. कपडे, अंथरुण पांघरुणावर किटकनाशक औषधांचा वापर करावा. खुल्या जागी शौचाला जाणे टाळावे. झाडाझुडपात काम करुन आल्यावर कपडे गरम पाण्यात भिजवून धुवावेत. स्क्रब टायफसचे रुग्ण आढळून आलेल्या रुग्णाच्या घराच्या अवती भोवती असणाऱ्या लहान मोठी खुरटी झाडे, झुडपे काढून टाकावीत. चिग्गर आढळून आलेल्या ठिकाणी जमिनीची नांगरणी तसेच जमिनीवरील सर्व पालापाचोळा जाळून टाकण्यात यावे. पाळीव प्राणी व पोल्ट्री पक्षी असलेल्या ठिकाणी तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार किटकनाशकाची धुरळणी व परिसर स्वच्छ ठेवण्यात यावे.
सद्यस्थितीत सडक/अर्जुनी, अर्जुनी/मोरगाव, सालेकसा व तिरोडा या तालुक्यात स्क्रब टायफस या आजाराचे रुग्ण आढळून आलेले आहे. त्यापैकी सडक/अर्जुनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पांढरी अंतर्गत ग्राम थारेझरी येथील एका महिला रुग्णाचा मृत्यू सुध्दा झालेला आहे. त्याअनुषंगाने आरोग्य विभागामार्फत जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.आर.पटले यांनी संबंधीत गावात भेट देवून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या आहेत. संशयीत रुग्ण आढळून आले असले तरीही नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. वरील दक्षता प्रत्येकाने घेतल्यास संबंधीत किटकाचा नायनाट होईल म्हणजे योग्य काळजी व वेळीच केलेले उपचार तुम्हाला होणाऱ्या आजारापासून दूर ठेवेल. त्याकरीता किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्याकरीता सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.