तापाचा संशयित रुग्ण आढळल्यास तात्काळ उपचार करा- जिल्हाधिकारी

0
12

स्क्रब टायफसचा आढावा
सर्व गावात हिवताप सर्व्हे करण्याचे निर्देश
डिस्चार्ज रुग्णाचा फॉलोअप घ्या
गोंदिया दि.१७ : – जिल्ह्यात सध्या स्क्रब टायफस या आजाराची साथ सुरू असून कुठेही तापाचा संशयित रुग्ण आढळल्यास तात्काळ उपचार करावा. त्यासोबतच सर्व गावात हिवताप सर्व्हेक्षण करावे अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या. तसेच तापाची लक्षणे जाणवल्यास नागरिकांनी जवळच्या रुग्णालयात तपासणी करावी असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज स्क्रब टायफस बाबत बैठक घेण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम.राजा दयानिधी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शाम निमगडे व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
स्क्रब टायफस या आजाराचे जिल्ह्यात ९ रुग्ण आढळून आले. त्यापैकी २ रुग्ण दगावले असून काही रुग्णावर उपचार सुरू आहेत तर काही रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. यावर बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा नियमीत फॉलोअप घेण्यात यावा. त्याचप्रमाणे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात यावी.
हिवताप हे या आजाराचे प्राथमिक लक्षण असून आरोग्य विभागाने सर्व गावांचा हिवताप सर्व्हे करावा अशा सूचना त्यांनी दिल्या. आरोग्य यंत्रणा व आशा वर्कर यांची तात्काळ बैठक घेऊन स्क्रब टायफस आजारा विषयी गावागावात जनजागृती अभियान राबवावे असे निर्देश त्यांनी दिले. या आजाराच्या उपचारासाठी औषध साठा पुरेसा असून तो तालुका आरोग्य यंत्रणेपर्यंत पोहचवला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

ताप, डोकेदुखी, हातपाय दुखणे, किडा चावलेल्या ठिकाणी व्रण दिसतो, मळमळ व ओकाऱ्या येणे, शुद्ध हरपणे, चालताना तोल जाणे. यापैकी ताप, डोकेदुखी, हातपाय दुखणे ही कारणे साधारणत: आपण फारशी गांभिर्याने घेत नाही. मात्र आरोग्य विषयक जागृत राहून वरील लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या शासकीय रुगणालयात संपर्क करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.स्क्रब टायफस या आजारावरील उपचार तुलणेने स्वस्त आहेत. तापेच्या औषधांनीही तो बरा होऊ शकतो. विशेषत: डॉक्सिसायक्लीन वा टिट्रासायक्लीन नावाचे इंजेक्शन व गोळ्यांच्या आधारेही त्यावर नियंत्रण मिळविता येते. विशेष म्हणजे ही औषधे जेमतेम शंभर रुपयांच्या आत मिळतात. त्यामुळे घाबरण्याचे अजिबात कारण नाही असे आरोग्य विभागाने आवाहन केले आहे.