सिरोंचा तहसिल कार्यालयावर राष्ट्रवादीचा मोर्चा

0
14

सिरोंचा,दि.१७: बेरोजगार,शेतकरी,शेतमजुर व गोरगरीब जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
कोत्तागुडम येथून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या बांधकाम व वित्त सभापती भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते ऋतुराज हलगेकर, राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, जिल्हा उपाध्यक्ष फईमभाई काजी, सेवादल जिल्हाध्यक्ष प्रभाकर बारापात्रे, राकाँचे सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लुरी, उपाध्यक्ष कलाम भाई, सत्यम पिडगू, रायुकाँचे तालुकाध्यक्ष श्रीनिवास कडार्लावार, पंचायत समिती उप सभापती कृष्णमूर्थी रिकुला, उज्वल तिवारी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी,कार्यकर्ते आणि शेकडो नागरिक मोर्चात उपस्थित होते.
तालुक्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढली असून,नोकरभरतीवरील बंदी तत्काळ उठवून जिल्हा निवड समितीमार्फत भरती प्रक्रिया राबवावी व त्यात स्थानिकांना प्राधान्य द्यावे, अहेरी जिल्हा घोषित करून सिरोंचाला उपजिल्ह्याचा दर्जा द्यावा, तसेच विद्यमान सिरोंचा तालुक्याचे विभाजन करुन दोन नवीन तालुक्याची निर्मिती करावी, मेडिगड्डा प्रकल्प पीडितांना त्वरित भरपाई द्यावी, सिरोंचा ते आसरअली मार्गाची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, स्थानिकांना बांधकामाकरिता आवश्यक असलेल्या रेतीची व्यवस्था करण्यात यावी, सिरोंचा तालुक्यातील सर्व खेड्यापाड्यातील लोकांना श्रावणबाळ योजना, संजयगांधी निराधार योजनांचा लाभ देऊन वनहक्क पट्टे वाटप करण्यात यावे, सिरोंचा तालुका मुख्यालयात १०० खाटाचे रुग्णालय तयार करून आवश्यक तज्‍ज्ञ डॉक्टरांची भरती करण्यात यावी इत्यादी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देऊन विस्तृत चर्चा करण्यात आली.