कुष्ठरुग्ण शोध अभियान यशस्वीतेसाठी जनतेनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे

0
10

गोंदिया,दि.४ : जिल्ह्यात दर दहा हजारी कुष्ठरुग्णांचे प्रमाण १ पेक्षा जास्त (पीआर २.०८) आहे. म्हणून जिल्ह्यामध्ये कुष्ठरुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने पल्स पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर विशेष कुष्ठरुग्ण शोध अभियान २४ सप्टेंबर ते ९ ऑक्टोंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. हे अभियान यशस्वीतेसाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.
१४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली कुष्ठरुग्ण शोध अभियानबाबत बैठक घेण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे याची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी कुष्ठरोग सहायक संचालक डॉ.आर.जे.पराडकर यांच्याकडून या अभियानाबाबत सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, स्वयंसेवक यांचेमार्फत प्रत्यक्ष घरोघरी जावून कुटूंबातील सर्व सदस्यांचे त्वचा रोग तपासणी करण्यात येईल. महिला सदस्यांची तपासणी आशा वर्करमार्फत व पुरुष सदस्यांची तपासणी चमुमधील पुरुष स्वयंसेवक यांचेमार्फत करण्यात येणार आहे.
डॉ.एम राजा दयानिधी यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना सर्व शाळांमध्ये दैनंदिन प्रतिज्ञेच्यावेळी कुष्ठरुग्ण शोध अभियानाबाबत गावातील स्थानिक आरोग्याशी संबंधीत कर्मचारीमार्फत कुष्ठरुग्णाविषयी तसेच या मोहिमेबाबत माहिती देण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे आठवडी प्रभातफेरीच्या दिवशी सदर मोहिमेबाबत घोषणा देण्याच्या सूचना देण्यात आले. गावपातळीवरील आरोग्य पाणीपुरवठा व स्वच्छता समितीमार्फत गावातील सर्व नागरिकांना या मोहिमेमध्ये सहयोग आणि सहभाग घेण्याकरीता पंचायत समिती विभागामार्फत सूचना देण्याचे ठरविण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम राष्ट्रीय अभियान असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, सामाजिक घटक, शासकीय/निमशासकीय कार्यालयातील विभाग प्रमुख, प्रसार माध्यमे, शाळा/महाविद्यालय विद्यार्थी यांना व जिल्ह्यातील सर्व जनतेला घरी तपासणीसाठी आलेल्या चमुला सहकार्य करुन सदर अभियान यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी केले आहे. बैठकीस डॉ.एम.बी.राऊत, डॉ.अनंत चांदेकर, उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) लोकेश मोहबंशी, डॉ.शफिया फातेमा, के.एम.ठाकरे, डॉ.सीमा यादव, यु.एस.राठोड व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.