भाजपचे आमदार लोढा संपत्तीत देशात दुसर्याक्रमांकावर

0
5

मुंबई,दि.19 : देशातील 3 हजार 145 आमदारांमध्ये सर्वाधिक उत्पन्न असलेल्या पहिल्या 20 आमदारांमध्ये महाराष्ट्रातील चार आमदारांनी स्थान मिळवले आहे. सुमारे 34 कोटी वार्षिक उत्पन्न असणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगलप्रभात लोढा हे या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. कर्नाटकातील कॉंग्रेस आमदार एन. नागराजू पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांचे वार्षिक उत्पन्न 157.04 कोटी रुपये आहेत.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर) या संस्थेने ही पाहणी केली आहे. एडीआरने देशभरातील सर्व आमदारांचे सर्वेक्षण केले. देशभरातील एकूण तीन हजार 145 आमदारांमध्ये सर्वाधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या पहिल्या 20 आमदारांमध्ये महाराष्ट्रातील चार आमदारांचा समावेश आहे. भाजपचे आमदार व उद्योगपती मंगलप्रभात लोढा हे या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांचे वार्षिक उत्पन्न 34.66 कोटी आहे. लोढा यांनी आपण नोकरी करत असल्याचा उल्लेख केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे आमदार दिलीप सोपल सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांचे वार्षिक उत्पन्न 9.85 कोटी आहे. वकिली व शेती व्यवसाय असल्याचा उल्लेख त्यांनी आपले उत्पन्न जाहीर करताना केला आहे. सिडकोचे अध्यक्ष आणि भाजपचे प्रशांत ठाकूर यांचे वार्षिक उत्पन्न 5.61 कोटी रुपये आहे. ते या यादीत 17व्या स्थानी आहेत. कॉंग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे वार्षिक उत्पन्न 4.56 कोटी उत्पन्नासह 20व्या स्थानी आहेत.

सरासरी उत्पन्न 43.4 लाख
महाराष्ट्रातील एकूण 256 आमदारांचे सरासरी वार्षिक उत्पन्न 43.4 लाख रुपये आहे. 2013 ते 2017 दरम्यान झालेल्या निवडणुकांमध्ये देशातील 4 हजार 86 श्रीमंत आमदारांमध्ये आमदारांपैकी 3 हजार 145 आमदारांनी वार्षिक उत्पन्न निवडणूक आयोगाकडे सादर केले आहे. त्यानुसार असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) हा अहवाल तयार केला आहे. सर्वांत कमी उत्पन्न असलेल्या 20 आमदारांच्या यादीत राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न 9.09 लाख आहे.