संस्था बळकट करायच्या, तर व्यवहारावर नियंत्रण आवश्यक आहे-फुंडे

0
282
भंडारा, दि. २3 :सहकारी संस्था बळकट करावयाच्या असतील तर संस्थांचे अद्यावत व्यवहार व त्या  व्यवहारावर संस्थेच्या पदाधिकारी/ संचालकांचे व्यवहारावर नियंत्रण असणे गरजेचे असून संस्थेच्या अनावश्यक खर्चात काटकसर करून संस्थेच्या उत्पन्नात कशाप्रकारे वाढ करण्यात येईल यावर संस्थेच्या संचालकांनी,पदाधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी भर दिला पाहिजे.  जिल्ह्यात वारंवार संस्थेच्या गटसचिवांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असून मोठ्या प्रमाणात संस्थेमध्ये अफरा-तफर होत असल्याच्या घटना समोर येत आहे. याला आळा घालण्यासाठी प्रत्येक संस्थेने अथवा ३-४ संस्था मिळून स्वतंत्र एक गटसचिव नियुक्त करून संस्थेचे कामकाज चालवावे. जेणेकरून संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेला घोटाळा हा थांबविता येईल, असे मत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी व्यक्त केले.
नुकतीच जिल्हा देखरेख सहकारी संस्थेची ९ वी वार्षीक आमसभा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय स्थानावरून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी वरील उद्गार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या मंचावर अध्यक्ष स्थानी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी भुषविले. कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून खा. मधुकर कुकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग – १ तसेच नवीन संचालक मंडळाचे संचालक, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आमसभेला संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास देशपांडे यांनी प्रास्ताविकेतून संस्थेने संस्थेमार्फत राबविल्या जात असलेल्या सर्व शासकीय योजनांचा सक्षिप्त आढावा घेवून संलग्न सेवा सहकारी संस्थांकडून प्रभावी व जलद गतीने कामकाजाची अपेक्षा व्यक्त केली.
फुंडे म्हणाले की, जिल्ह्यातील ३६८ वि.का.सेवा सहकारी संस्था ह्या जिल्हा देखरेखेच्या सभासद आहेत. तेव्हा ज्या संस्था सध्या तोट्यात आहे त्या संस्थेच्या अध्यक्षांनी व कर्मचार्‍यांनी संस्था कशी फायद्यात येईल याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. नियमाने संस्थांनी आपल्या संस्थेचे कामकाज करावे. एक आनंदाची बाब म्हणजे ३६८ वि.का.सेवा सहकारी संस्था यांच्यापैंकी केवळ ६२ गटसचिव कार्यरत असून सन २०१७-१८ चे लेखा परिक्षण उत्तम असून या परिक्षणाद्वारे कुणालाच आक्षेपार्ह अथवा गंभीर बाब आढळून आली नाही. तेव्हा इतरांनीही त्वरीत गट सचिव नेमावा असा सल्ला फुंडे यांनी दिला. अध्यक्ष पदाचे  सुत्र सांभाळले असता संस्थेत अधिकृत भागभांडवल ५ लक्ष रूपये असून वसुल भाग भांडवल ०.४० लक्ष आहे.  बैद्यनाथन समितीच्या शिफारशीनुसार प्रत्येक संस्था किमान नफ्यात असणे व संस्थेचा दैनंदीन रेकॉर्ड सी.ए.एस. नुसारच असणे आवश्यक आहे. नियमानुसारच ऑडीट फी देणे व संस्था तोट्यात असल्यास ती नफ्यात कशी आणता येईल याचा विचार करणे कळाची गरज आहे. त्यासाठी बैद्यनाथन समितीच्या व ९७ व्या घटना दुरूस्तीची पुस्तके संस्थांना देण्यात यावे असे सांगून संस्थांच्या पदाधिकारी/संचालकांना संस्थांचे कामकाज, शेतीपुरक व्यवसायासाठी योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याने त्यासाठी तज्ञ प्रशिक्षक व संस्थांचे ऑडीट बद्दलची माहिती देणेसाठी तज्ञ मार्गदर्शक बाहेरून बोलविण्यात यावे असे सुचविले आणि याबाबत भंडारा जिल्हा देखरेख सह. संस्था भंडाराने पुढाकार घेवून योग्य कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली. तसेच कामचुकार, गटावर न जाणारे व अफरातफर करणार्‍या गटसचिवांवर कडक कारवाई करण्याचे संबंधीत अधिकार्‍यांस निर्देष दिले. प्रसंगी इतर संस्थेच्या अध्यक्षांनी सुचविलेल्या सुचनांवर अंमलबजावणी करण्यात येईल असे प्रसंगी सांगितले. कार्यक्रमा प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष होमराज कापगते यांनी आभार मानले.