काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक गांधी जयंतीला सेवाग्राममध्ये

0
9

वर्धा,दि.24(विशेष प्रतिनिधी) :   महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसच्या सर्वोच्च समिती असलेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीची (सीडब्ल्यूसी) बैठक येत्या  2 अक्टोबरला सेवाग्राम (जि. वर्धा) येथे होत आहे.येत्या 2 अक्टोबरपासून महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती सुरू होत आहे. यानिमित्त देशात विविध कार्यक्रम घेतले जात आहे. केंद्र सरकारनेही विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. काँग्रेसने सेवाग्रामला सीडब्ल्यूसी बैठक आयोजित करून एक अभिनव प्रकारे महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्याचे ठरविले आहे.

या निमित्ताने सेवाग्राममध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधींसह काँग्रेस पक्षाचे जवळपास 70 वरिष्ठ नेते सेवाग्राममध्ये दाखल होणार आहेत.देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलेले भारत छोडो आंदोलनाचा ठराव याच सेवाग्राममध्ये 14 जुलै 1942 रोजी झाला होता. या ठरावाला वर्धा ठराव असे म्हटले जाते. येथूनच स्वातंत्र्य आंदोलनाला एक वेगळे परिमाण लाभले. येथूनच मुंबईतून भारत छोडो आंदोलन करण्याचा निर्णय झाला होता. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील सीडब्ल्यूसी कोणता ठराव संमत करणार, याबद्दल राजकीय जाणकारांमध्ये उत्सुकता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्यासाठी व बुद्धीवंतांमध्ये एक वेगळा संदेश देण्यासाठी सेवाग्राममध्ये ही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली जात असल्याचे बोलले जात आहे. ही बैठक यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचे सरचिटणीस अशोक गहलोत व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आज नागपूरला दाखल झाले तेथून ते सेवाग्रामला रवाना झाले.