बोगस पटसंख्या दाखविणार्या शाळेच्या मुख्याध्यापक व सचिवाविरुध्द गुन्हा दाखल

0
15

तुमसर,दि.24ः- तालुक्यातील प्राथमिक शाळांनी विद्यार्थी पटसंख्या वाढवून २६ लाखांची शासनाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाबाबत दोघा मुख्याध्यापकांसोबतच सचिवाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये तालुक्यातील हसारा व देव्हाडी येथील शाळेच्या मुख्याध्यापकासंह शिक्षण संस्थासचिवांचा समावेश आहे.याप्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला असला तरी अद्यापही कुणालाच अटक करण्यात पोलीसांना यश आलेले नाही.

तुमसर तालुक्यातील हसरा येथे आदर्श ग्रामीण विकास विद्या प्रसारक मंडळाची आदर्श प्राथमिक शाळा आहे. या शाळेची २०११-१२ मध्ये विद्यार्थी पटसंख्या ३७ होती. मात्र शासकीय अनुदान लाटण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून त्याआधारे तब्बल 141 एवढी विद्यार्थी पटसंख्या वाढवण्यात आली.  तसेच २ शिक्षकांची भरतीसुद्धा करण्यात आली.  शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेत तब्बल १५ लाख ८३ हजार रुपयांना शासनाला फसविण्यात आले. पट पडताळणी मोहिमेच्या वेळेस ही फसवणूक लक्षात आली. त्यानंतर संस्थेचे सचिव आर एस ठाकूर आणि मुख्याध्यापक एम एफ बिसेन यांच्या विरुद्ध तुमसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे देव्हाडी येथील प्रगती बहुउद्देशिय शिक्षण संस्थेच्या येथील इंदिरा प्राथमिक शाळेत उघडकीस आली आहे.  ३० विद्यार्थी  पटसंख्या असलेल्या या शाळेने तब्बल १२३ विद्यार्थी पटसंख्या दाखवली, आणि शाळेत २ शिक्षकांची भरतीदेखील केली. तसेच शासकीय योजनांचा लाभ घेत १० लाख १५ हजार रुपयांना शासनाला फसवले. या फसवणुकीची शिक्षण विभागाला माहिती होताच विभागाने संस्थेचे सचिव विश्वनाथ खोब्रागडे आणि मुख्यध्यापिका दमाहे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीचा गुन्हा जरी आत्ता दाखल झाला असला, तरी फसवणूक झाल्याचे २०११ मध्येच समोर आले होते.