जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित दर्जा

0
5

मुंबई,दि.२५ : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे पद राज्य शासनाच्या कृषी विभागात गट ‘ब’ मध्ये रुपांतरित करून त्याला आता राजपत्रित दर्जा देणे आणि गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देण्याच्या योजनेत सुधारणा करण्याचे महत्वपूर्ण निर्णय आज (दि.२५) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले.विशेष म्हणजे याच बैठकित राज्यातील अधिस्विकृतीधारक पत्रकारांना शिवशाही बसमध्ये सुध्दा सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

1 . महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसप्रवास भाड्यात विविध सामाजिक घटकांना दिलेल्या सवलतीत वाढ.

2.    महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमीची स्थापना करण्याचा निर्णय.

3.    गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देण्याच्या योजनेत सुधारणा.

4. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) या जोडन्यायालयांऐवजी जिल्हा व सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर मेहकर ही दोन न्यायालये नियमित स्वरुपात कार्यरत करण्यासह पदनिर्मितीस मान्यता.

5.    जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे पद राज्य शासनाच्या कृषी विभागात गट ब मध्ये रुपांतरित करून त्याला आता राजपत्रित दर्जा.

6.    विविध घटकांना प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींचा धारणाधिकार रुपांतरित करताना अवलंबण्याची कार्यपद्धती-अटी-शर्ती व अधिमूल्य इत्यादींसंदर्भात शिफारस करण्यासाठी नियुक्त समितीच्या अहवालास मान्यता.

7. मुंबईच्या गोरेगावमधील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची साडेपाच एकर जमीन न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून भाडेपट्टा करारावर मे. व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल लिमिटेड या संस्थेस देण्यास मान्यता.