रेती माफियांचा तहसीलदारांवर हल्ला

0
14

पवनी,दि.28ः- अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेले पवनीचे नायब तहसीलदार हेमंत कांबळे यांच्यावर रेती माफियांनी हल्ला केला. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
नायब तहसीलदार हेमंत कांबळे हे तलाठी व लिपिक यांच्यासोबत गस्तीवर असताना रात्री १ वाजताच्या सुमारास कोरंभी रोडजवळ एका ट्रॅक्टरला थांबविला. ट्रॅक्टर मध्ये १ ब्रास रेती आढळली. ट्रॅक्टर चालक मालक सुभाष परमानंद लांजेवार रा. ताडेश्‍वर वार्ड पवनी यांना रॉयल्टी विचारले असता रॉयल्टी नसल्याचे त्यांनी सांगितले. यावरून ट्रॅक्टर मालक व नायब तहसीलदार कांबळे व कर्मचारी यांच्यात शाब्दिक वाद झाला. ट्रॅक्टर मालकाने फोन करुन काही साथीदारांना बोलविले. त्यानंतर ट्रॅक्टरमधील रेती रिकामी करून नायब तहसीलदार कांबळे यांच्या अंगावर धावून शर्टची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. कांबळे यांच्या उजव्या डोळ्यावर सूज आली असून मानेवर ओरबडल्याचे चिन्हे आहेत. ट्रॅक्टर व ट्राली जप्त करुन ट्रॅक्टर चालक सुभाष परमानंद लांजेवार यास अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. तक्रारीवरुन पवनी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर वर्मा करीत आहेत